कल्याण लोहमार्ग न्यायालयात रेल्वेची ४५२० प्रकरणे निकाली; १६ लाख ८० हजारांचा दंड वसूल
By अनिकेत घमंडी | Published: March 4, 2024 02:35 PM2024-03-04T14:35:28+5:302024-03-04T14:35:34+5:30
या न्यायालयात आरपीएफ च्या ४२७९ गुन्ह्यांचा निपटारा झाला असून, २४१६ प्रकरणे व्ही. सी. द्वारे निकाली काढण्यात आली.
डोंबिवली: रेल्वे प्रवासातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी रेल्वे प्रशासना बरोबर आर पी एफ आणि लोहमार्ग पोलीस यांच्याकडून प्रयत्न केले जात असून, गुन्हेगाराला शिक्षा देण्यासाठी न्यायालयात देखील कडक धोरण अवलंबले जात आहे. कल्याण लोहमार्ग न्यायालयात नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये ४५२० गुन्ह्याची प्रकरणे निकाली काढली आहेत. यामध्ये १६ लाख ८० हजाराचा दंड वसूल करून तीन लाख ३५ हजार रुपये रेल्वेला नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
कल्याण येथील लोहमार्ग न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालत न्यायाधीश स्वयम् शैलेंद्र चोपडा यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी रेल्वेत चोरी करणे, मारामारी, रेल्वेचे नुकसान, फुकटे प्रवासी, महिलांची छेड आदी विविध गुन्हे करणाऱ्याची प्रकरणे या लोक अदालती मध्ये ठेवण्यात आली होती. यापैकी ४५२० प्रकरणे निकाली काढून १६ लाख ८० हजारांचा दंड वसूल केला आहे. कारागृहात सजा भोगणाऱ्या १२३ कैद्यांनी गुन्हा कबूल केल्याने त्यांना सोडण्यात आले आहे.
या न्यायालयात आरपीएफ च्या ४२७९ गुन्ह्यांचा निपटारा झाला असून, २४१६ प्रकरणे व्ही. सी. द्वारे निकाली काढण्यात आली. रेल्वे तिकीट तपासनीस यांच्या ३१५ प्रकरणांचा निकाल लावला आहे. तर रेल्वेचे नुकसान, अवैध तिकीट व्यवसाय, रेल्वे मालमत्तेची चोरी करणाऱ्या ३३ जणांवर न्यायालयाने दंडात्मक कारवाई केली आहे.