Swine Flu : कल्याण, डोंबिवलीवर स्वाईन फ्ल्यूचं संकट; आढळले 48 रुग्ण, 2 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 05:33 PM2022-08-10T17:33:27+5:302022-08-10T17:39:49+5:30
Swine Flu : स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्यबाबत महापालिकेतर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून लोकांनी सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी लक्षणे आढळून आल्यास स्वतः ला अलगीकरण (आयसोलेट) करावे.
कल्याण - कल्याण-डोंबिवली शहरात स्वाईन फ्ल्यूचं संकट घोंगावत आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात 01 जून 2022 पासून स्वाईन फ्लूचे 48 रुग्ण आढळून आले आहेत.. त्यापैकी 22 रुग्ण औषधोपचाराखाली आहेत व 24 रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे 2 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
स्वाईन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्यबाबत महापालिकेतर्फे जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून लोकांनी सर्दी, खोकला, घसादुखी, ताप अशी लक्षणे आढळून आल्यास स्वतः ला अलगीकरण (आयसोलेट) करावे, गर्दीत जाऊ नये तसेच मास्कचा वापर करावा व ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्फत करण्यात येत आहे.
महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालय, शास्त्रीनगर रुग्णालय तसेच वसंत व्हॅली येथे स्वाईन फ्लूचे लसीकरण केंद्र चालू करण्यात आली आहेत. सदर लस दुसऱ्या व तिसऱ्या महिन्यातील गरोदर महिला, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्ती व फ्ल्यू रुग्णांची तपासणी, देखभाल, उपचारात सहभागी असलेल्या डॉक्टर्स, नर्सेस आरोग्य कर्मचारी यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लस कोरोना लसीसोबत घेण्यात येऊ नये तसेच कोरोना लस व स्वाईन फ्लू लस यामध्ये किमान दोन आठवड्याचे अंतर असावे. ही लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या शरीरात इन्फ्लुएंन्झा विरोधी प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास किमान दोन आठवड्याचा कालावधी लागतो आणि यामुळे मिळालेली प्रतिकारशक्ती जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत टिकू शकते त्यामुळे हे लसीकरण दरवर्षी घेणे आवश्यक ठरते.