कल्याण : कचऱ्यापासून खत तयार करणाऱ्या सोसायट्यांना ५ टक्के मालमत्ता करात सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 06:31 PM2021-05-29T18:31:53+5:302021-05-29T18:33:40+5:30
कर वसूलीवरून राजकारण तापल्याने नागरिकांना केडीएमसीचे आवाहन
कल्याण-कल्याणडोंबिवली महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन कराची वसूली सुरु केल्याने त्याला भाजपने तीव्र विरोध केला. भाजप पाठोपाठ मनसेनेही विरोध केला. मात्र या कर आकारणीवरुन शिवसेना भाजपमध्ये चांगली जुंपून बॅनरबाजी सुरु झाल्याने आत्ता महापालिकेने कर वसूलीस नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नागरीकांना केले आहे. तसेच ज्या सोसायट्या कचऱ्यायापासून खत तयार करीत आहे. त्यांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत दिली जाईल असे स्पष्ट केले.
कर वसूली स्थगित करण्यात यावी अशी मागणी राजकीय पक्षांकडून केली जात आहे. केंद्र सरकारने ८ एप्रिल २०१६ रोजी नागरी घनकचरा नियमावली लागू केली आहे. त्यानुसार कर लागू करण्याचे आदेश दिले आहेत. सरकारने १९ डिसेंबर २०१९ मध्ये अधिसूचना प्रसिद्ध करुन सूचना हरकती मागविल्या होत्या. त्यानंतर १ जुलै २०१९ मध्ये अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करुन ही कर वसूली सुरु करण्याचे आदेश दिले. सर्व पालिकांनी ही कर वसूली ११ जुलै २०१९ पासून लागू करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महापालिकेने हा कर लागू करुन त्याची वसूली सुरु केली आहे. केवळ कल्याण डोंबिवली महापालिकेने हा कर लागू केला नसून अन्य महापालिकांमध्येही त्यांची अंमलबजावणी सुरु आहे. ज्या सोसायट्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन खत तयार करीत आहेत .अशा सोसायट्यांना मालमत्ता करात पाच टक्के सवलत दिली जाईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
२०२० पासून शून्य कचरा मोहीम
महापालिकेने मे २०२० पासून शून्य कचरा मोहिम हाती घेतली आहे. ही मोहीम महापालिका क्षेत्रत प्रभावीपणो राबविली जात आहे. त्याचा परिमाण म्हणून आधारवाडी डंपिंग ग्राऊंड बंद करण्यात आले आहे. आधारवाडीवर टाकण्यात येणारा कचरा उंबर्डे आणि बारावे प्रकल्पाच्या ठिकाणी टाकला जात आहे. त्याचबरोबर उंबर्डे, आयरे, बारावे, कचोरे या ठिकाणी प्रत्येकी १० टन क्षमतेते बायोगॅस प्रकल्प सुरु आहेत. तसेच सीएसआर फंडातून बारावे येथे २५ टन क्षमतेचा बायोगॅस प्रकल्पही सुरु आहे. कचरा मुक्त महापालिका करण्यासाठी प्रशासनाचे विविध प्रयत्न सुरु आहे. त्याचा एक भाग म्हणून कचरा कर वसूल केला जात आहे. नागरीकांनी त्यास सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
आयुक्तांचा सत्कार
आधारवाडी डंपिंग ग्राऊंड एका वर्षात बंद करण्यात आले. त्यामुळे लाखो नागरीकांची दुर्गंधीपासून सुटका झाली आहे. तसेच महापालिकेचे वर्षाला साडे पाच कोटी रुपये वाचले आहेत. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही किमया साधल्याने बांधकाम व्यावसायिक प्रकाश लेले, प्रफुल्ल गवळी, डॉ. केदार परांजपे, पारसमल जैन यांनी आयुक्तांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.