कल्याण, डाेंबिवली रेल्वेस्थानक पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत ५० गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 12:27 AM2020-12-13T00:27:38+5:302020-12-13T00:27:45+5:30
प्रवासी वाहतूक सुरू हाेताच गुन्ह्यांमध्ये वाढ
अनिकेत घमंडी
डाेंबिवली : अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी जूनपासून लाेकलसेवा, तर लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यात आल्या. त्यानंतर. महिलांनाही लाेकलसेवा उपलब्ध करण्यात आली. लाेकलसेवा सुरू हाेताच रेल्वेतील गुन्हेगारी घटनांनीही डाेके वर काढले आहे. कल्याण आणि डाेंबिवलीच्या लाेहमार्ग पाेलीस ठाण्यात या गुन्ह्यांची नाेंद झाली. कल्याण लाेहमार्ग पाेलीस ठाण्यांतर्गत गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे.
कल्याण जंक्शन स्थानकात ४२, तर डोंबिवली स्थानक पाेलीस ठाण्यात आठ गुन्हे नोंदचले गेले. कल्याण स्थानकात उत्तरेसह दक्षिणेला जाणाऱ्या बहुतांशी लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात, तसेच कसारा, कर्जत, खोपोली मार्गावरून व कल्याण स्थानकातून एक हजारांहून जास्त लोकल फेऱ्या हाेतात.
त्यामुळे या स्थानकात अहोरात्र प्रवाशांची वर्दळ असते. त्यात चोरटे त्यांचा डाव साधतात. डोंबिवली हे मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असले, तरीही त्या स्थानकात फारसे गुन्हे घडत नसल्याचे तीन महिन्यांत निदर्शनास न आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.डी. शार्दुल म्हणाले.
डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात जून ते ऑगस्ट शून्य गुन्ह्यांची नोंद आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये या रेल्वेस्थानकाच्या पाेलीस ठाण्यात आठ गुन्ह्यांची नोंद झाल्याची माहिती यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी दिली.
चाेरीचे गुन्हे वाढले
रेल्वेप्रवासादरम्यान जून ते आजतागायत नाेंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे चाेरीच्या गुन्ह्यांचे आहे. आतापर्यंत तीन लाख २७ हजार १६७ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कल्याणमध्ये सर्वाधिक
कल्याण-बदलापूर, वांगणी, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड, टिटवाळा, आसनगाव, खडवली, वासिंद, कसारा ही गर्दीची स्थानके आहेत. त्यामुळे त्या हद्दीत घडलेली कोणत्याही चोरीची, गुन्ह्यांची नोंद कल्याण स्थानकात होत असल्याने गुन्ह्यांचे प्रमाण कल्याणमध्ये जास्त असल्याचे निदर्शनास येत असल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.