कल्याण येथील अंतार्ली गावात ‘महाहब’ उभारणीसाठी ५०० कोटी मंजूर; श्रीकांत शिंदेंच्या पाठपुराव्याला यश
By मुरलीधर भवार | Published: June 27, 2023 06:30 PM2023-06-27T18:30:33+5:302023-06-27T18:30:52+5:30
महाराष्ट्रातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महाहब’ कल्याण तालुक्यातील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे.
कल्याण - महाराष्ट्रातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महाहब’ कल्याण तालुक्यातील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपयांची तत्वत: मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत सोमवारी मंत्रालयात याबाबत एक बैठक पार पडली. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी हा मोठा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून कल्याण येथे लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे.
खासदार शिंदे यांच्या पुढाकाराने मतदार संघात अनेक नवनवीन प्रकल्प उभे राहत आहेत. रस्ते काँक्रिटीकरण्याची कामे, ऐतिहासिक मंदिर परिसर सुशोभीकरण, भुयारी गटार, जल जीवन मिशन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, आगरी कोळी वारकरी भवन यांसारखे अनेक प्रकल्प मतदारसंघात मार्गी लागत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील इनोव्हेशन इको सिस्टीमवर आधारीत ‘महाहब’ कल्याण तालुक्यातील अंतार्ली गावात साकारण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून ठाणे तसेच कल्याण या परिसरात मजबूत उदयोजकीय इको सिस्टीम तयार करण्यात येणार आहे. भविष्यात महाराष्ट्रातील स्टार्टअपची संख्या वाढावी, तसेच उद्योजकांना एका छताखाली स्टार्टअप आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी पोषक वातावरण मिळावे ही ‘महाहब’ची मुख्य संकल्पना आहे. यासाठी उद्योग विभागासह कौशल्य, रोजगार उदयोजकता आणि नावीन्यता विभाग, माहिती- तंत्रज्ञान यांच्यासह इतर विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत.
‘महाहब’मध्ये प्रामुख्याने उद्योग आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठीचे पोषक वातावरण तयार करण्याचे काम करण्यात येईल. ‘महाहब’ हे प्रामुख्याने स्टार्टअप सुरु करणारे उद्योजक, संशोधक, शैक्षणिक संस्था आणि गुंतवणूकदार यांना उपयोगी पडणार आहे. राज्य शासनामार्फत देण्यात येणाऱ्या विविध मान्यता, आवश्यक बैठका, चर्चासत्र, परिषदा याचे आयोजन आणि समन्वय या ‘महाहब’मार्फत करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने फिनटेक, डेटा सेंटर्स, औषधी कंपन्या, वाहन उद्योग, उत्पादन यांचा समावेश असणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी खासदार शिंदे हे सतत प्रयत्नशील होते. यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. बैठका घेतल्या. खासदार डॉ. शिंदे यांच्या प्रयत्नाना आता यश मिळाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सुमारे ५०० कोटी रुपयांच्या निधीस तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे लवकरच प्रकल्प उभारणीचे काम सुरु होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत सोमवारी मंत्रालयात याबाबत एक बैठक पार पडली. यावेळी त्यांनी या प्रकल्पासाठी निधीची मान्यता दिली आहे. या वेळी मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, माहिती तंत्रज्ञानचे प्रधान सचिव पराग जैन- नानौटिया, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदाल यांच्यासह ‘महाहब’चे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
‘महाहब’ नाविन्यपूर्ण आराखडयानुसार यामध्ये वन स्टॉप शॉप ही प्रमुख कल्पना आहे. यामध्ये विविध संसांधनासह इको सिस्टीम कार्यालये, कार्यालयासाठी आवश्यक जागा, क्षमता बांधणी, आंतरराष्ट्रीय कार्यक्रम, निधी, कायदेशीर तसेच आर्थिक बाबींमधील निपुणता, कौशल्य बांधणी, सॉफ्ट आणि हार्ड टेक्नॉलॉजीमधील पायाभूत सुविधा, संस्थात्मक भागीदारी यावर भर असणर आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योग मंत्री, कौशल्य विकास मंत्री, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव या समितीचे सदस्य असतील. माहिती व तंत्रज्ञानचे नोडल डिपार्टमेण्ट म्हणून काम पाहणार आहेत.