कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीस वैद्यकीय शिक्षणासाठी दिली ५० हजाराची मदत
By मुरलीधर भवार | Published: January 14, 2023 05:12 PM2023-01-14T17:12:27+5:302023-01-14T17:13:20+5:30
कल्याणमधील वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीस वैद्यकीय शिक्षणासाठी ५० हजाराची मदत करण्यात आली.
कल्याण : शहराच्या पश्चिम भागतील आग्रा राेडवर गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करणारे विलास कांगणे यांची मुलगी अनघा हीचा वैद्यकीय शिक्षणाकरीता मेरीटमध्ये नंबर आला आहे. तिच्या वैद्यकीय शिक्षणासाठी अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीने ५० हजार रुपयांची मदत दिली आहे. समितीने अनघाला शिक्षणासाठी मदत करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
कांगणे हे वृत्तपत्र विकून आपला उदरनिर्वाह करतात. त्यातून त्यांना महिन्याकाठी १८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. या मिळकतीवर ते कुटुंबाचा गाडा कसाबसा चालवितात. त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा नसली तरी सरस्वतीची कृपा झाली आहे. त्यांची मुलगी अनघा हीचा वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या शिक्षणाकरीता मेरीटमध्ये नंबर लागला आहे. तिच्या शिक्षणासाठी वर्षाला साडे चार लाख रुपयांचा खर्च आहे. हा खर्च भागविण्यासाठी तिच्या पालकांनी बॅंकेतून शिक्षणासाठी कर्ज काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. काेराेना काळात वृत्तपत्र विक्रीच्या व्यवसायावर गदा आली हाेती. त्यावेळी त्यांनी घेतलेल्या कर्जाचे हप्ते त्यांना वेळेवर भरता आले नाही. त्यामुळे नव्याने कर्ज देण्यास बॅंकेने नकार दिला.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अनघाची फी कूठून आणि कशी भरायची असा प्रश्न उभा ठाकला. अखिल महाराष्ट्र वंजारी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन ही अडचण त्यांनी कथीत केली.मुलगी अनघाची फी भरली नाही तर वर्ष वाया जाणार अशी चिंता त्यांना सतावित हाेती. वंजारी सेवा समितीने दाेन दिवसात ५० हजार रुपये देण्याचे कबूल केले. समितीचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक यांनी रक्कम जमा करुन वंजारी समितीच्या अध्यक्ष शंकर आव्हाड यांनी ५० हजार रुपयांचा धनादेश अनघाला दिला आहे. या प्रसंगी समितीचे पदाधिकारी अर्जून डाेमाडे, रामनाथ दाैंड, आत्माराम फड, अर्जून उगलमुगले, सनिल आंधळे, सतीश दराडे आदी उपस्थित हाेते. कांगणे यांनी समितीचे आभार मानले आहेत. तसेच मुलीच्या शिक्षणाच्या वाटेतील फीची अडचण दूर झाल्याने सुटकेचा निश्वास टाकला आहे.