काव्य किरण मंडळाचा ५२ वा वर्धापनदिन संपन्न
By अनिकेत घमंडी | Published: May 6, 2024 12:41 PM2024-05-06T12:41:50+5:302024-05-06T12:42:00+5:30
बालकवी ठोंबरे यांची पुण्यतिथी असल्याने त्यांची तसेच त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या संजीवनी मराठे व वि.म.कुलकर्णी यांच्या कविता त्यांनी सादर केल्या.
डोंबिवली: बावन्न वर्षे एखादे कवीमंडळ चालवणे, त्याचे सतत कार्यक्रम करणे ही सोपी गोष्ट नाही. काव्य किरण मंडळाने हे साध्य करून दाखविले याबद्दल मंडळाचे अभिनंदन करते व शुभेच्छा देते, असे उद्गार अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत उपाध्यक्षा डॉ. अरूंधती जोशी यांनी कल्याणला काव्य किरण मंडळाच्या ५२ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना काढले.
सभासद कवींच्या दर्जेदार कविता ऐकून या कवितांचे एक पुस्तक काढावे अशी सूचना त्यांनी केली. बालकवी ठोंबरे यांची पुण्यतिथी असल्याने त्यांची तसेच त्यांच्या मनात घर करून राहिलेल्या संजीवनी मराठे व वि.म.कुलकर्णी यांच्या कविता त्यांनी सादर केल्या. समारंभाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष कवी प्रवीण देशमुख हे होते. कार्यक्रमाची सुरवात संजीवनी जगताप यांच्या ईशस्तवन व सौ. सुमित्रा गुप्ता यांच्या सरस्वती वंदनाने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव गझलकार सागरराजे निंबाळकर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर मंडवाले व सौ. शुभांगी भोसले यांनी केले. कार्यक्रमाची व्यवस्था सुनील म्हसकर यांनी उत्तम केली होती. या कार्यक्रमात मंडळाच्या दिवंगत कवयित्री कै. ज्योति वैद्य शेटे यांच्या कवितांचे सादरीकरण स्वाती नातू यांच्या नियोजनाने, राघवेंद्र जोशी, मनोज केळकर, सीमा फडके, मंजीरी पैठणकर व मंगला कांगणे यांनी केले.
नंतर झालेल्या कविसंमेलनात वरील कवींसह मा. निलांबरी बापट, ज्योत्स्ना करमरकर, अरविंद बुधकर, मा. यशवंत वैद्य, मदनकुमार उपाध्याय, परमजीत सिंग, जगदीश उपाध्याय, सागर निंबाळकर, मनोहर मंडवाले, माधुरी वैद्य, शुभांगी भोसले, अस्मिता सावंत, सुनील म्हसकर आदींनी काव्य वाचन करून बहार आणली. या कार्यक्रमात रविंद्र सोनावणी यांच्याही कवितेचे सादरीकरण झाले. जेष्ठ साहित्यिक जनार्दन ओक यांनी भाग घेतलेल्या कवींचा उचित सन्मान करण्यात आला.