नागरी अभिवादन न्यास तर्फे डोंबिवलीतील ६ संस्थांचा सन्मान
By अनिकेत घमंडी | Published: February 11, 2024 04:57 PM2024-02-11T16:57:09+5:302024-02-11T16:58:36+5:30
संपत्तीला संस्कारांची जोड पाहिजे. : प्रमोद शिंदे
डोंबिवली : संपत्तीला संस्कारांची जोड पाहिजे. जसा कंपन्यांना नफ्याच्या दोन टक्के सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रेस्पोंसिबिलिटी) वर खर्च करणे बंधनकारक आहे तसे व्यक्तींनी स्वतःच्या शिलकीतील दोन टक्के तरी समाजऋण फेडण्यासाठी खर्च करावे असा विचार मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळाचे कार्यकारी विश्वस्त प्रमोद शिंदे यांनी मांडला.
नागरी अभिवादन न्यास, या डोंबिवली शहरातील ४७ संस्थांनी स्थापन केलेल्या शिखर संस्थेतर्फे गेली नऊ वर्षे शहरासाठी निरलासपणें काम करणाऱ्या ज्येष्ठांचा,तरुणांचा आणि संस्थेचा सन्मान केला जातो, त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिंदे बोलत होते.
या वर्षी गणेश मंदिर संस्थान,ब्राह्मण सभा,टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,अस्तित्व आणि रोटरी सेवा केंद्र या पाच संस्थांचा सन्मान शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वर्षीचा कार्यक्रम माजी अध्यक्ष कै. मधुकर चक्रदेव यांना समर्पित करण्यात आला होता.
डॉ.संदीप घरत हे कार्यक्रम अध्यक्ष होते. सुधीर जोगळेकर आणि श्री माधव जोशी यांनी प्रास्ताविक तर प्रवीण दुधे यांनी ऋणनिर्देश केला. जाई वैशंपायन यांनी सूत्र संचालन केले.