66 कोटी खर्चून केलेला रस्ता पुन्हा खोदला; मनसेनं मुख्यमंत्र्यांना दाखवला अंधार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 06:24 PM2023-06-18T18:24:43+5:302023-06-18T18:25:58+5:30
विशेष म्हणजे ६६ कोटी रुपये खर्चून हा रस्ता बांधण्यात आला होता. त्यावरुन, राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.
ठाणे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यात जरी सलोख्याचे संबंध असले तरी स्थानिक पातळीवर ठाण्यातील मनसैनिक आणि शिवसेना शिंदे गटातील नेत्यांमध्ये धुसफूस सुरूच असल्याचे दिसून येते. मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना स्थानिक नेत्यांकडे लक्ष देण्याचं आवाहन केलंय. तसेच, दिव्यातील स्थानिक नगरसेवक आपणास चुकीची माहिती देत आहेत, असेही त्यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन झालेला रस्ता खोदण्यात आला. विशेष म्हणजे ६६ कोटी रुपये खर्चून हा रस्ता बांधण्यात आला होता. त्यावरुन, राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.
मुख्यमंत्री साहेब, ७ जूनला दिवा येथील जो रस्ता आपल्या हस्ते जनतेसाठी खुला झाला, त्याच रस्त्याखालच्या नवीन जलवाहिनीला व्हॉल्व्ह लावले नाहीत. म्हणून आता तो पुन्हा खोदला जात आहे. या रस्त्यावर खर्च झालेले ६६ कोटी रुपये हे कोणाच्या घरचे नाहीत तर जनतेने घाम गाळून कमावलेले आहेत याची जाणीव आपणांसही असेलच, असे आमदार राजू पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच, आपण लोकार्पण केलेल्या दिवा-आगासन रस्ता व नवीन जलवाहिनीची कामं अजून पूर्णच झाली नाहीत. आपणांस दिव्यातील तुमचे माजी नगरसेवक व पदाधिकारी अंधारात ठेवत आहेत, यावर आम्ही काहीही केले तरी आपल्या समर्थकांना व आपल्या लाडक्या लोकप्रतिनिधीला त्यात राजकारण दिसते. म्हणून माझी आपणांस विनंती आहे की दिवा विभागात राहणाऱ्या सुमारे ४ लाख नागरीकांसाठी एकदा तटस्थपणे आढावा घ्या, आपणांस दिव्यातला अंधार दिसेल, अशा शब्दात आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. तसेच, दिव्यातील रस्त्याच्या खोदकामाचे फोटोही ट्विटवरुन शेअर केले आहेत.
मा.मुख्यमंत्री साहेब,७ जूनला दिवा येथील जो रस्ता आपल्या हस्ते जनतेसाठी खुला झाला,त्याच रस्त्याखालच्या नवीन जलवाहिनीला व्हॉल्व्ह लावले नाहीत म्हणून आता तो पुन्हा खोदला जात आहे. या रस्त्यावर खर्च झालेले ६६कोटी रुपये हे कोणाच्या घरचे नाहीत तर जनतेने घाम गाळून कमावलेले आहेत याची… pic.twitter.com/JweQPQu4RT
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) June 18, 2023
दरम्यान, राज्यात शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात सातत्याने वाद होताना दिसत आहे. तर, एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत. मात्र, मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आणि मुख्यमंत्र्यांच्या अनेकदा गाठीभेट होत असून अनेक कार्यक्रमात दोघे एकत्र आल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं. त्यामुळे, शिंदे गट आणि राज ठाकरे यांच्यातील सौख्य हे दोन्ही पक्षातील संभाव्य युतीचे संकेत असल्याचंही काहीजण चर्चा करतात. मात्र, मुंबई आणि ठाण्यातील स्थानिक परिस्थिती वेगळी असल्याचे दिसून येते.