केडीएमसी हद्दीत अवघ्या २२ दिवसांत ६,६७६ रुग्ण; सोमवारी सापडले तब्बल ६८६ नवे बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 12:12 AM2021-03-23T00:12:11+5:302021-03-23T00:12:28+5:30
आतापर्यंतची सर्वोच्च रुग्णसंख्या, केडीएमसीच्या हद्दीत पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. ८ जूनपर्यंत लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णांची संख्या एक हजार ५६२ इतकी होती
कल्याण : कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरूच असून, सोमवारी तब्बल ६८६ नवे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंतची ही सर्वोच्च रुग्णसंख्या असून, याआधी १२ जुलैला सर्वाधिक ६६१ रुग्ण आढळले होते. सोमवारी दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर २४ तासांत ४२३ रुग्णांना उपचाराअंति बरे झाल्याने डिस्चार्ज मिळाला आहे. नव्या रुग्णांची भर पडल्याने सद्य:स्थितीला पाच हजार १५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या २२ दिवसांत सहा हजार ६७६ रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
केडीएमसीच्या हद्दीत पहिला रुग्ण १४ मार्चला सापडला होता. ८ जूनपर्यंत लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णांची संख्या एक हजार ५६२ इतकी होती, तर यातील ४६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. परंतु, आजमितीला कोरोनाबाधितांचा आकडा ७१ हजार १५५ पर्यंत पोहोचला आहे. यातील ६४ हजार ८७७ रुग्ण उपचाराअंति बरे होऊन घरी परतले आहेत. तर एक हजार २२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण पश्चिम आणि डोंबिवली पूर्व भागात रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणात वाढत असून, सोमवारी अनुक्रमे तब्बल २२६ आणि २३५ रुग्ण आढळले आहेत. डोंबिवली पश्चिमेतही ९७, तर कल्याण पूर्वेत ८७ नवे रुग्ण सापडले आहेत, तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे आढळलेल्या नव्या रुग्णांमध्ये ८० ते ८५ टक्के रुग्ण हे लक्षणेविरहित आहेत.
जून महिन्याचा रेकॉर्ड तोडला
८ जून २०२०पासून लॉकडाऊन संपुष्टात येऊन अनलॉक सुरू झाले. १ जून ते ३० जून कालावधीत नवे पाच हजार ५४२ रुग्ण आढळून आले होते. जून महिन्यातील रुग्णसंख्येला पाठीमागे टाकून मार्च महिन्यातील २२ दिवसांत रुग्णांचा आकडा सहा हजार ६७६ वर पोहोचला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाचा कहर सुरूच असून, कोरोनाच्या वाढलेल्या संक्रमणाला नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरत असल्याचे बोलले जात आहे.