कल्याणच्या पत्री पुलाचा ७०० मेट्रिक टन गर्डर ३९ मीटर पुढे सरकवला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 05:39 PM2020-11-21T17:39:00+5:302020-11-21T17:40:01+5:30
उद्या उर्वरीत भाग 4 तासाचा मेगा ब्लॉक घेऊन गर्डर पुढे सरकवला जाणार
कल्याण-कलाणच्या पत्री पूलाचा ७०० मेट्रिक टन वजनाचा भला मोठा गर्डर आज चार तासाचा रेल्वे मेगा ब्लॉक घेऊन ३९ मीटर पुढे सरकविला गेला आहे. उद्या उर्वरीत भाग 4 तासाचा मेगा ब्लॉक घेऊन पुढे सरकवला जाणार आहे. या कामाच्या पाहणीसाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे कल्याणमध्ये आले होते. त्यांनी कामाच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त केले आहे.
कल्याणच्या ब्रिटिशकालीन पत्री पूल वाहतूकीच्या दृष्टीने धोकादायक झाल्याने तो पाडण्यात आला होता. गेल्या दोन वर्षापासून या पत्री पूलाचे काम सुरु आहे. त्यात काही तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यासाठी खासदास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. ७०० मेट्रीक टन वजनाचा गर्डरचे पार्ट हैद्राबाद येथील कंपनीत तयार करण्यात आले होते. त्यानंतर त्याचे फिटींग कल्याण येथे करण्यात आले. आज चार तासाचा मेगाब्लॉक घेऊन हायड्रोलिक पद्धतीने पूलाचा ३९ मीटर भाग आज पुढे सरकविला गेला. या कामाची सुरुवात करण्यापूर्वी खासदास शिंदे यांनी त्यांच्या समर्थकांसह कल्याण पूव्रेतील जरीमरी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर खासदार शिंदे हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आले. याठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रमुख राधेश्याम मोपलवार, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनीता राणे, आमदार विश्वनाथ भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
पत्री पूलाच्या गर्डर टाकण्याच्या कामाची पाहणी करुन पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी सांगितले की, पत्री पूलाचा प्रश्न मोठा होता. तो आत्ता मार्गी लागत आहे. त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. विकासाची कामे संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. राज्यभरातील जी काही रखडलेली पूलाची आणि रस्तायीची कामे आहेत. ती मार्गी लावली जातील. येत्या वर्षभरात समृद्धी महामार्गाचेही काम मार्गी लावण्याचा सरकारकारचा प्रयत्न आहे.
या पूलाच्या गर्डर टाकण्याच्या वेळीच विरोधकांकडून टिका केली जात असल्याविषयी पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, निवडणूकीपूरती राजकारण करणो मी समजू शकतो. आमची शिवसेना निवडणूक संपली की, कामे पूर्ण करण्याकडे लक्ष्य देते. अन्य पक्ष निवडणूकीनंतरही बारा महिने राजकारण करतात. त्यांना त्यांचे राजकारण करु द्या आम्ही जनतेची कामे करु असा टोला विरोधकांना ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे.
आज गर्डर टाकण्याच्या कामाच्या वेळी रेल्वेचे अभियांत्रिकी विभागाचे विविध अधिकारी, रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि पोलिस यांचा भला मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या पूलाच्या कामाचा पाठपुरावा करणारे खासदार शिदे यांनी सांगितले की, ही एक ऐतिहासिक घटना आहे. पुढील ३०० वर्षे हा पूल टिकेल असे या पूलाचे निर्माण करण्यात आले आहे.