दाेन महिन्यांत तयार केला ७०० टनांचा गर्डर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 12:56 AM2020-11-23T00:56:55+5:302020-11-23T12:12:06+5:30
रिषी अग्रवाल यांची माहिती
मुरलीधर भवार
कल्याण : शंभर वर्षे जुना ब्रिटिशकालीन कल्याणचा पत्रीपूल हा वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने तो पाडण्यात आला. हा पूल नव्याने तयार करण्यासाठी त्याचा भला मोठा गर्डर तयार करण्याचे काम हैदराबाद येथील ग्लोबल स्टील कंपनीला देण्यात आले. दिवसरात्र एक करून कंपनीने अवघ्या दोन महिन्यांत ७०० टन वजनाचा ७६ मीटर लांबीचा भला मोठा गर्डर तयार केला. अनेक अडचणींवर मात करून या गर्डरचे लाॅंंचिंग सुरू आहे. कंपनीसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे ग्लोबल कंपनीचे प्रमुख रिषी अग्रवाल यांनी सांगितले.
कल्याण रेल्वेवरील पत्रीपुलाचे पाडकाम केल्यावर नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत हाेता. कंत्राट मिळालेल्या ग्लोबल कंपनीतील ५० कामगारांनी राबून गर्डर बनवला. ताे हैदराबाद येथून कल्याणला आणायचा, ताेच मार्चमध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. पत्रीपुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तेलंगणा सरकारकडे मागणी करून गर्डर कल्याणला नेण्याची विशेष परवानगी मिळवली. त्यानंतर विशेष वाहनांची सोय करून ताे येथे आणण्यात आल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. ग्लोबल कंपनीने आतापर्यंंत १५ गर्डर तयार केले आहेत. मुंबई-दहिसर मेट्रोच्या कामात व जेएनपीटी येथे लागणारे गर्डरही या कंपनीने बनवले आहेत.
किमान १०० वर्षे आयुष्य
ओपन वेब असलेला भला मोठा गर्डर असून त्यासाठी सीएनसी कटिंग, सीएनसी ड्रिलिंग आणि सीएनसी वेल्डिंग केलेले आहे. जवळपास २५ किलोमीटरचे वेल्डिंग केलेले आहे. गर्डरसाठी ई-५३ ग्रेडचे स्टील वापरलेले आहे. २६ हजार बोल्टचा वापर केला आहे. त्यासाठी युरोपियन मशिनरीचा वापर करण्यात आला आहे. या पुलाचे आयुष्य किमान शंभरपेक्षा अधिक वर्षांचे आहे. गर्डर कमी वेळेत तयार करण्याचे आव्हान आमच्या कामगारांनी दिवसरात्र राबून पेलले, असे अग्रवाल म्हणाले.