कल्याण-डोंबिवलीत दिवसाला होणार ७ हजार कोरोना टेस्ट; विजय सूर्यवंशी यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 11:39 PM2021-03-22T23:39:08+5:302021-03-22T23:39:34+5:30
रवींद्र चव्हाण यांनी घेतली भेट, पूर्वेत मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यासोबत खासगी रुग्णालयात जी लसीकरणाची केंद्रे सुरू आहे
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रोखण्यासाठी कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढवले जाणार अहे. सध्या तीन हजार ५०० केल्या जात आहेत. त्यात दुप्पट वाढ करून दिवसाला सात हजारांच्या घरात टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती सोमवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भाजप शिष्टमंडळास दिली.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. परिस्थिती गंभीर होत आहे. मात्र, डोंबिवली पूर्वेत महापालिकेने मोफत लसीकरण केंद्र सुरू केलेले नाही. यामुळे या भागात मोफत लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी आयुक्तांकडे केली. त्यावेळी बोलताना आयुक्तांनी हा मानस व्यक्त केला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे उपस्थित होते.
महापालिकेने डोंबिवली पश्चिमेत शास्त्रीनगर रुग्णालयात मोफत लसीकरण केंद्राची सुविधा उपलब्ध केली आहे. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता डोंबिवलीतील रुग्णांची संख्या वाढ जास्त आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची लस मोफत देण्याची सुविधा डोंबिवली पूर्व भागात नाही. त्यामुळे तेथील नागरिकांना पश्चिमेतील शास्त्रीनगर रुग्णालयात जावे लागते. तेथे जाताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. शिवाय वेळ व पैशाचा अपव्यय होत असल्याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.
पूर्वेत मोफत लसीकरण केंद्र सुरू करण्यासोबत खासगी रुग्णालयात जी लसीकरणाची केंद्रे सुरू आहे. त्या ठिकाणी केवळ एका दिवसाला १०० जणांना कोरोनाची लस दिली जात आहे. त्यात वाढ करून दिवसाला किमान ५०० जणांचे लसीकरण करावे, अशी सूचना त्यांनी केली. आयुक्तांनी नेमका किती लस साठा मागविला आहे. त्याचा पुरवठा का होत नाही. कमी का मागविला जात आहे, याबाबतही चव्हाण यांनी जाब विचारला.