८ महिला आंदोलक मुक्त, २२ कोठडीत, रेल्वे न्यायालयाचा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 09:30 AM2024-08-22T09:30:44+5:302024-08-22T09:30:51+5:30
रेल्वे पोलिसांनी जवळपास ३०० अनोळखी आंदोलकांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण : बदलापुरातील शाळेत घडलेल्या गैरप्रकाराच्या निषेधार्थ बदलापूर स्थानकात रेल रोको आंदोलन करणाऱ्या ज्या २२ आंदोलकांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली होती त्यांना बुधवारी रेल्वे न्यायालयाने कोठडी सुनावल्याने सगळ्यांची रवानगी आधारवाडी कारागृहात करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्या आठ महिलांची रेल्वे न्यायालयाने मुक्तता केली. रेल्वे पोलिसांनी जवळपास ३०० अनोळखी आंदोलकांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सुमारे ३०० जणांविरोधात रेल्वे पोलिस कायदा, भारतीय रेल्वे कायदा, महाराष्ट्र पोलिस कायदा आणि भारतीय दंड संहिता यामधील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून ३० जणांना कल्याण रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यातील आठ महिला आंदोलकांना न्यायालयाने सोडून दिले. उर्वरित २२ पुरुष आंदोलकांना न्यायालयात हजर केले. या २२ आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन घ्यावा लागणार आहे.
वकील प्रियेश जाधव आणि पंकज अटकळे हे कल्याण रेल्वे पोलिस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींची कागदपत्रांवर सही घेण्यासाठी गेले असता त्याठिकाणी पोलिसांनी या वकिलांना अटकाव केला. दोन्ही वकिलांनी रेल्वे पोलिसांच्या कृतीविषयी तीव्र संताप व्यक्त केला. याबाबत पोलिस निरीक्षक लक्ष्मण चव्हाण यांनी सांगितले की, रेल्वे पोलिस ठाण्यातील लॉकअपनजीक सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. दोन वकिलांना आरोपींच्या सह्या घेण्याकरिता सहकार्य केले आहे. त्यांनी लावलेला आरोप चुकीचा आहे.
वकिलांचा पवित्रा
बदलापूर वकील संघटनेचे अध्यक्ष मंगेश गवळी यांनी सांगितले की, बदलापूरच्या आंदोलनाकरिता अटक केलेले २२ जण हे कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. घडलेली घटना ही अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह आहे. घटनेचा निषेध करण्यासाठी ही मंडळी आली होती. आंदोलन शांततेने सुरू होते. पोलिसांनी लैंगिक अत्याचाराबाबत वेळीच गुन्हा दाखल केला असता तर ही वेळ आली नसती. पोलिसांनी आंदोलकांवर अजामीनपात्र कलमे लावली आहेत. यामधील अनेकांवर नाहक आरोपीचा शिक्का लागला.