कल्याण-डोंबिवलीत 86 टक्के कोरोना लसीकरण पूर्ण; सोशल डिस्टन्सिंगचे केले पालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 11:02 PM2021-02-26T23:02:12+5:302021-02-26T23:02:17+5:30
सोशल डिस्टन्सिंगचे केले पालन : लस घेतल्यानंतर झाला नाही त्रास
मुरलीधर भवार
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेने कोरोनाची लस उपलब्ध होताच सहा ठिकाणी असलेल्या आठ लसीकरण केंद्रातून पहिल्या टप्प्यातील ९६ टक्के लसीकरण पूर्ण केले. दुसऱ्या टप्प्यातील ५५ टक्के लसीकरण पार पडले असून दोन्ही टप्प्यातील एकूण लसीकरण ८६ टक्के झाले आहे. .
लसीकरण सुरु झाल्यावर पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर आणि नर्स यांना लस दिली जाणार होती. त्यासाठी सरकारी रुग्णालये आणि खाजगी रुग्णालयांकडून माहिती मागवून लाभार्थीची ऑनलाइन यादी तयार करण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी असलेल्या लाभार्थ्यांची संख्या ९ हजार ७५ होती. त्यापैकी ८ हजार ७२२ जणांनी लस घेतली. त्यामुळे एकूण ९६ टक्के लसीकरणाचे पूर्ण झाले.
पहिल्या टप्प्यात लस घेतलेल्यांनी दुसरा डोस २८ दिवसांनी घ्यायचा असल्याने १ हजार २५३ जणांनी लस घेतली आहे. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईनवर वर्कर्सचे लसीकरण सुरु झाले. त्यासाठी लाभार्थ्यांची संख्या ६ हजार ८४१ होती. त्यापैकी ३ हजार ७८२ जणांनी लस घेतली. दुसऱ्या टप्प्यात ५६ टक्के लसीकरणाचे काम पार पडले आहे.
महापालिकेस सरकारकडून लसीचे २१ हजार डोस प्राप्त झाले आहेत. दुसऱ्या टप्प्यात प्रमाण कमी होत असताना आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांनी स्वत: लस घेऊन लसीकरणाला प्रोत्साहन दिले. त्यानंतर लसीकरणाचे प्रमाण वाढले आहे.
- डॉ. प्रतिभा पानपाटील,वैद्यकीय अधिकारी, केडीएमसी.