मुंबई वडोदरा महामार्गासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू
By मुरलीधर भवार | Published: February 29, 2024 01:30 PM2024-02-29T13:30:45+5:302024-02-29T13:30:57+5:30
कल्याण बल्याणी मधील धक्कादायक घटना, याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगरसेवक पाटील यांच्यासह मयत मुलीच्या कुटुंबीयांनी केली
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बल्याणी गावात मुंबई वडोदरा महामार्गाचे काम सुरू आहे मुंबई वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम सुरू आहे .या कामादरम्यान अंडरपास मोरी बनवण्याचे काम सुरू आहे . या मोरीजवळ साचलेल्या सांड पाण्यात तीन वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू झाल्याचे धक्कादायक घटना आज सकाळी ११ वाजता घडली आहे .या मुलीचे नाव रेहमुनीसा रियाज शहा असे आहे . या घटनेमुळे मुंबई वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम करीत असलेल्या ठेकेदारकडून निष्काळजीपणा केला जातो. आणि तो कसा जीवघेणा ठरतोय, ही बाब उघड झाली.
कल्याणजवळ असलेल्या बल्ल्यानी येथे राहणारे चांद शेख शहा यांचे नातेवाईक रियाज शहा हे मीरा भाईंदरला राहतात .बल्यानी येथे शेख पीर वल्ली शहा बाबा यांचा २७ तारखेपासून उरूस सुरू आहे .या उरू मध्ये सहभागी होण्यासाठी रियाज शहा हे चांद शहा यांच्या घरी आले . सोबत त्यांची तीन वर्षाची मुलगी रेहमूनिसा देखील होती .आज सकाळी रेहमूनिसा घरी दिसत नसल्याने त्याच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. काही वेळाने तिचा मृतदेह चाळी लगत असलेल्या मुंबई वडोदरा जेएनपीटी महामार्गाच्या अंडरपास मोरीत साचलेल्या पाण्यात आढळून आला .
घटनेची माहिती मिळताच शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली . टिटवाळा पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली . या रस्त्याच्या कामाच्या संबंधित ठेकेदाराकडे या अंडरपासमध्ये सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे मागणी अनेकदा स्थानिक नागरिकांनी केली होती. मात्र संबंधित ठेकेदाराने या मागणीकडे दुर्लक्ष केले ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळेच आज या तीन वर्षाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. या आधी देखील खड्ड्यात पडून दोन ते तीन मुले जखमी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगरसेवक पाटील यांच्यासह मयत मुलीच्या कुटुंबीयांनी केली . तसेच ठेकेदाराने संबंधित मयत मुलीच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी देखील माजी नगरसेवक पाटील यांनी केली आहे. टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून घटनेचा पंचनामा सुरू आहे मुलीचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येणार आहे.