स्फोट दुर्घटनेत सिव्हिल डिफेन्सच्या ४० जणांच्या टीमने केले ३६ तास बचावकार्य
By अनिकेत घमंडी | Published: May 24, 2024 10:06 PM2024-05-24T22:06:32+5:302024-05-24T22:08:13+5:30
दुर्घटना घडल्यापासून कार्यरत
डोंबिवली: अंबर कंपनीत गुरुवारी रिऍक्टर स्फोटाची दुर्घटना घडल्यानंतर सिव्हिल डिफेन्सने स्वतःचा जीव धोक्यात घालून बचावकार्य सुरू केले. त्यासाठी ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली परिसरातील स्वयंसेवकानी अधिकाऱ्यांनी त्यात सहभाग घेतल्याचे उपमुख्यक्षेत्र रक्षक, ठाणे बिमल वसंत नाथवाणी यांनी सांगितले. दुर्घटना घडल्याचे समजताच त्यांची टीम घटनास्थळी आली, आणि त्यांनी क्षणाचा विलंब न लावता मदत कार्याला सुरुवात केली. नाथवाणी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राहुल घाटवल, जयप्रकाश पुल्हाकुडी, शकुंतला रॉय, अनिल शेलार, राजेश प्रभाकर, उमेश बसरकर आणि अन्य सहकाऱ्यांनी काम पाहिले. मृतदेह शोधणे, कोणी जिवंत आहे की नाही हे पहाणे, मिसींग तक्रार करत असल्यास त्यानुसार शोध घेणे, तसेच स्वतःचा जीव धोक्यात घालून आगीजवळ कार्यरत राहण्याचे काम त्या सगळ्यांनी केले.
महिला स्वयंसेवकांनी गर्दीवर नियंत्रण मिळवणे, पोलीस यंत्रणेला सहकार्य करणे तसेच नाथवाणी जे सांगतील त्यानुसार कार्यरत राहण्यासाठी तत्परता दाखवली. मृतदेह दिसताच गोंधळ न घालता मोठ्या।हिमतीने त्यांनी गुरुवारी सात मृतदेह स्फोटाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढले. त्यासाठी ते सातत्याने एमआयडीसीच्या अग्निशमन अधिकाऱ्यांशी संपर्कात होते. उपनियंत्रक विजय जाधव हे मदतकार्यावर लक्ष ठेवून असल्याचे ते म्हणाले. त्याखेरीज ढिगारा बाजूला करणे, केमिकल असलेले पिंप सुरक्षित आहेत की नाही हे बघणे आदी कार्य देखील त्यांनी केले. गुरुवारचे मदतकार्य त्यांनी रात्री दहा नंतर तर शुक्रवारी सकाळपासून सुरू।केलेले काम त्यांनी रात्री ८ वाजता अंधार असल्याने थांबवले. शनिवारी देखील कार्य सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
या सिव्हिल डिफेन्स टीम मधील स्वयंसेवकानी या आधी प्रोब्रेस, इर्शाल गड, गुजरात भूकंप, दत्तनगर इमारत।दुर्घटना यांसह अनेक ठिकाणी आपत्तीमह्ये मदतकार्य केले असल्याचे सांगण्यात आले.
औद्योगिक कपन्यांमधील मालक, संचालकांनी त्यांच्या कामगारांना एखादी।दुर्घटना घडल्यास प्रथमोपचार असो की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी काय करायला हवे याचे प्रशिक्षण, कार्यशाळा घ्यायला हव्यात, त्यासाठी आम्ही त्यांना सर्वतोपरी मदत करू, असे आवाहन आहे. : बिमल वसंत नाथवाणी, उपमुख्यक्षेत्र रक्षक, ठाणे सिव्हिल डिफेन्स