कल्याणच्या एनआरसी कॉलनी परिसरात मोठा स्फोट!

By मुरलीधर भवार | Published: February 16, 2024 03:51 PM2024-02-16T15:51:15+5:302024-02-16T15:51:36+5:30

नागरीकांच्या जिवीताला धोका असल्याने ब्लास्टींग थांबविले नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

A big explosion in the NRC colony area of Kalyan! | कल्याणच्या एनआरसी कॉलनी परिसरात मोठा स्फोट!

कल्याणच्या एनआरसी कॉलनी परिसरात मोठा स्फोट!

कल्याण : मोहने आंबिवली परिसरातील एनआरसी कॉलनी काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की त्यामुळे मोहने, आंबिवली, तिपन्नानगर, एनआरसी कॉलनी परिसरातील नागरीकांच्या घरांना मोठे हादरे बसले. या घटनेमुळे नागरीक भयभीत झाले आहे. ब्लास्ट करणाऱ्या विकासकाच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी केली आहे. नागरीकांच्या जिवीताला धोका असल्याने ब्लास्टींग थांबविले नाही तर या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

काल सायंकाळी सात वाजता एनआरसी कॉलनी परिसरात मोठा ब्लास्ट झाला. त्यामुळे नागरीकांच्या घरांना हादरे बसले. नागरीकांनी भयभीत होऊन घराबाहेर आले. या प्रकरणी नागरीकांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्याकडे हा प्रकार कथीत केला. त्यांनी स्थानिक माजी नगरसेवक पाटील यांना सूचित केले. माजी नगरसेवक पाटील यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थली जाऊन पाहणी केली. माजी नगरसेवक पाटील यांनी आरोप केला आहे की, एनआरसी कंपनीची जागा लिलावात अदानी उद्योग समूहाने घेतली आहे. या उद्योग समूहाकडून त्याठिकाणी विकासाचे काम सुरु आहे. त्यासाठी हे ब्लास्ट केले जातात. त्यामुळे नागरीकांचा जिवितास धोका निर्माण झाला आहे. 

नागरीक भयभीत झाले आहे. महापालिकेने एनआरसी कॉलनीतील घरे धोकादायक असल्याचे सांगितले. ती घरे पाडली जात आहे. कामगारांची थकीत देणी एनआरसीकडून मिळालेली नाही. थकीत देण्याचा विषय न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थिती विकासकाने ब्लास्टींग करीत आहे. हे ब्लास्टींग बेकायदेशीर असल्याने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे मागणी करण्यात येणार आहे.

या परिसरातील नागरीकांनी सांगितले की, महापालिकेने एनआरसी कॉलनीतील घरांना नोटिसा लावल्या. घरे धोकादायक असल्याचे सांगितले. त्या नोटिसमध्ये अदानीने पर्यायी घरे द्यावीत असे म्हटले होते. त्यांच्याकडून पर्यायी घरांची व्यवस्था न करता त्यांना वाटेला लावण्याचा प्रकार केला आहे. ज्या घरात नागरीक राहत आहे. त्यांना या ब्लास्टिंगचा हादरा बसल्याने ते नागरीक घाबरले आहेत. हे प्रकार थांबविले गेले नाहीत नागरीक रास्ता रोको आणि प्रसंगी रेल रोको आंदोलन करतील असा इशारा दिला आहे. या संदर्भात कंपनीचे प्रवक्ते यांनी सांगितले की, एनआरसी कंपनीज्या जागेत लॉजिस्टिक पार्क उभारला जात आहे. त्याकरीता हा ब्लास्टींग केले जात आहे. ब्लास्टींगसाठी लागणारी परवानगी सरकारी यंत्रणांकडून घेण्यात आली आहे.
 

Web Title: A big explosion in the NRC colony area of Kalyan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण