मांडा व खडवली परिसरातील ६३ वीज चोरांविरुद्ध गुन्हा दाखल, महावितरणची कारवाई
By अनिकेत घमंडी | Published: February 20, 2024 06:46 PM2024-02-20T18:46:35+5:302024-02-20T18:47:04+5:30
या आरोपींनी १५ लाख ६८ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आल्याची माहिती मंगळवारी महावितरणने दिली.
डोंबिवली: महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील मांडा आणि खडवली परिसरातील ६३ जणांविरूद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींनी १५ लाख ६८ हजार रुपयांची वीजचोरी केल्याचे उघडकीस आल्याची माहिती मंगळवारी महावितरणने दिली.
मांडा शाखा कार्यालयांतर्गत दळवी चाळ, श्रद्धा चाळ, अन्सारी चाळ, मोहोली रोड, उंबारणी गाव, साईबाबा कॉलनी, सिद्धी विनायक कॉलनी, संतोषी माता नगर, एकदंत कॉलनी, गरीब नवाज चाळ, पिंपळेश्वर नगर, मानवी, स्वामी समर्थ चाळ, जीएम चाळ, मरयाम चाळ, अदनान चाळ तर खडवली शाखेतील निखिल चाळ, अशोक नगर, बाबा चाळ, नडगाव, गोटिया चाळ, सुशिल चाळ, गजानन फॉर्च्युन सिटी, निंबवली आदी भागात महावितरणच्या पथकाने ग्राहकांच्यावीज जोडण्यांची तपासणी केली. यात ६३ जणांकडून वीज मीटरकडे येणाऱ्या केबलला टॅपिंग करून वीजचोरी सुरू असल्याचे आढळले.
या सर्वांना वीजचोरीचे देयक व तडजोड रक्कम भरण्याबाबत नोटिस बजावण्यात आली. परंतू विहीत मुदतीत सदर रकमेचा भरणा न झाल्याने मांड्याचे सहायक अभियंता तुकाराम घोडविंदे यांच्या फिर्यादीवरून ४० आणि खडवलीचे कनिष्ठ अभियंता अलंकार म्हात्रे यांच्या फिर्यादीवरून २३ जणांविरुद्ध मुरबाड पोलिस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.