महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By अनिकेत घमंडी | Published: September 14, 2023 05:58 PM2023-09-14T17:58:09+5:302023-09-14T17:58:23+5:30
महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण व दमदाटीच्या गुन्ह्यात जबर शिक्षेची तरतूद आहे.
डोंबिवली:-थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या दोघांविरुद्ध विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डोंबिवली पश्चिमेतील खंडोबा मंदिर परिसरात बुधवारी सायंकाळी ही घटना घडली.
तेजस शिर्के आणि शुभम शिर्के (रुम नं. ४३, मनीबाई निवास, खंडोबा मंदिराजवळ, डोंबिवली) असे या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. वारंवार सूचना देऊनही वीजबिल न भरणाऱ्या पी. एस. देसाई या ग्राहकाचा वीजपुरवठा वरिष्ठ तंत्रज्ञ अमोल दुड्डे व सहकारी आकाश गायकवाड यांनी खंडित करून मीटर काढले. यावर देसाईंच्या घरात राहणाऱ्या व वीज वापरकर्त्या तेजस व शुभम शिर्के यानी वरिष्ठ तंत्रज्ञ दुड्डे आणि सहकारी गायकवाड यांना मारहाण व दमदाटी करत अडवून ठेवले. कर्मचाऱ्यांनी संपर्क करून ही माहिती सहायक अभियंत्यांना दिली.
सहायक अभियंता ई. ए. शेख यांनी घटनास्थळी धाव घेत कर्मचाऱ्यांची सुटका केली व विष्णुनगर पोलीस ठाणे गाठले. दुड्डे यांच्या फिर्यादीवरून तेजस व शुभम शिर्के यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा, मारहाण अशा भारतीय दंड विधानाच्या विविध सहा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक अमोल आंधळे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण व दमदाटीच्या गुन्ह्यात जबर शिक्षेची तरतूद आहे. कर्तव्यावरील महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामात व्यत्यय न आणता त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.