सर्व पक्षीय युवा मोर्चा आंदोलकांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By मुरलीधर भवार | Published: July 8, 2024 04:07 PM2024-07-08T16:07:53+5:302024-07-08T16:08:17+5:30
कल्याण : २७ गावातील सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने सोनारपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या ...
कल्याण : २७ गावातील सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने सोनारपाडा येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरु करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी धरणे आंदोलन करणाऱ्या २२ जणांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवा मोर्चाचे अध्यक्ष गजानन पाटील यांच्यासह संतोष केणे, हुनमान पाटील, महेश संते, कर्सन पाटील, मधूकर माळी, संदीप पालकरी, शिवाजी माळी, मधूकर पाटील, सुनिल पाटील, रामचंद्र पाटील, अजित म्हात्रे, शिरीषकुमार म्हात्रे, उत्कर्ष म्हात्रे, महादू म्हात्रे, संजय म्हात्रे, अनिल म्हात्रे, विनय म्हात्रे, कुणाल पाटील, दीपक म्हत्रे आणि रतन पाटील या २२ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २७ गावे कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्यात यावी. तसेच कल्याण शीळ रस्ते बाधितांना मंजूर केलेला मोबदला त्वरीत देण्यात यावा. कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या कामामुळे नागरीकांना होत असलेला त्रास दूर करण्यात यावा. या विविध मागण्याकरीता पावसाळी अधिवेशनानिमित्त राज्य सरकारचे लक्ष वेधण्याकरीता धरणे आंदोलन सुरु करण्यात आले.
आंदोलकांनी पोलिस ठाण्याकडे परवानगी मागितली होती. पोलिसांनी परवानगी दिलेली नसताना धरणेआंदोलन सुुरु करण्यात आले. आंदोलकांनी उपोषणाचा मंडप उभारण्याकरीता रस्ता खोदून खड्डे केले. मंडप उभारण्याची परवानगी महापालिकेकडून घेतली नाही. या कारणास्तव पोलिसांनी आंदोलकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. युवा मोर्चाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी सांगितले की, पोलिसांनी परवानी दिली नाही. हे खरे असले तरी ज्या जागेत उपोषणाचा मंडप उभारला ती जागा महापालिकेची नसून एमआयडीसीची आहे. धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. २७ गावांच्या मागण्यासंदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारने आमच्या मागण्याची दखल घेतली नाही तर स्थगित केलेल आंदोलन सर्व परवानग्या घेऊन पुन्हा केले जाईल असा इशारा पाटील यांनी दिला आहे .