महापालिका परिक्षेत्रात राबविण्यात आली सर्वंकष स्वच्छता मोहीम

By सचिन सागरे | Published: April 7, 2024 06:13 PM2024-04-07T18:13:52+5:302024-04-07T18:14:17+5:30

केडीएमसी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिमेकडील साईचौक येथून या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ झाला.

A comprehensive cleanliness campaign was implemented in the municipal area | महापालिका परिक्षेत्रात राबविण्यात आली सर्वंकष स्वच्छता मोहीम

महापालिका परिक्षेत्रात राबविण्यात आली सर्वंकष स्वच्छता मोहीम

कल्याण : गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होणाऱ्या मराठी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर रविवारी कल्याण डोंबिवली परिक्षेत्रात सर्वकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. केडीएमसी आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिमेकडील साईचौक येथून या स्वच्छता मोहिमेचा प्रारंभ झाला.

‘२० मे रोजी मतदान करणार ही शपथ घेऊन, मतदानाची जनजागृती करीत, उत्सव निवडणुकीचा, अभिमान देशाचा’ ही घोषणा देत स्वच्छता मोहिमेची सुरुवात करण्यात आली. ही स्वच्छता मोहीम आयुक्त निवास, संतोषी माता रोड, यशवंतराव चव्हाण क्रीडांगण, सहजानंद चौक,  छत्रपती शिवाजी महाराज चौक, केडीएमसी मुख्यालय, पारनाका, फडके मैदान त्याचप्रमाणे साई चौक, खडकपाडा, आधारवाडी चौक, डीबी चौक, गणपती चौक, आधारवाडी चौक या परिसरात आणि डोंबिवलीमध्ये भाग शाळा मैदान, पंडित दीनदयाळ रोड, क्रांतीनगर झोपडपट्टी मार्ग, डॉ. राजेंद्र प्रसाद रोड, चार रस्ता मानपाडा आणि इंदिरा गांधी चौक, बाजीप्रभू चौक, गणेश मंदिर या परिसरात राबविण्यात आली.

या मोहिमेत केडीएमसी आयुक्तांबरोबर स्वच्छ भारत अभियानाचे महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रुपिंदर कौर मुर्जानी, बिर्ला महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेशचंद्र बिर्ला, नाईट कॉलेजचे प्राचार्य हरीश दुबे, आयएमएच्या अध्यक्षा डॉ. सुरेखा इटकर यांच्यासह सदस्य, केडीएमसी उपायुक्त धैर्यशील जाधव, माहिती व जनसंपर्क विभाग प्रमुख संजय जाधव, कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत, मुख्य स्वच्छता अधिकारी व वसंत देगलूरकर, सहा. आयुक्त सोनम देशमुख, डॉ. भाग्यश्री मोघे, कुणबी समाज प्रतिष्ठानचे मनोज आंबेकर, महापालिकेचे इतर अधिकारी कर्मचारी आणि अनेक एनजीओ, एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सक्रिय सहभाग घेतला.

या मोहिमेचे वेळी आयुक्त डॉ. जाखड़ यांनी उपस्थित महिला सफाई कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. डोंबिवली परिसरात राबवण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापालिकेच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, उपायुक्त रमेश मिसाळ, पर्यावरण दक्षता मंचच्या रूपाली शाईवाले, अनुरा सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी, सहा आयुक्त चंद्रकांत जगताप आणि इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
 

Web Title: A comprehensive cleanliness campaign was implemented in the municipal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.