ठेकेदारावर गोळीबार प्रकरणात वेगळे वळण, रिव्हॉल्व्हर चेक करताना झाला होता गोळीबार
By मुरलीधर भवार | Published: June 6, 2023 03:58 PM2023-06-06T15:58:26+5:302023-06-06T15:58:50+5:30
नोकर आणि अन्य एका विरोधात गुन्हा दाखल, पोलीस तपास सुरू
कल्याण-टिटवाळा ठेकेदारावर गोळीबार प्रकरणी पोलीस तपास सुरू असताना या घटनेला आता वेगळेच वळण लागले आहे. जखमी ठेकेदार उमेश साळुंखे व त्याचा मित्र शिंदे नावाचा मित्र हे घराजवळील शेडमध्ये बसले होते. उमेश यांच्याजवळील रिव्हॉल्वर शिंदे यांनी घेतली. ही रिव्हॉल्व्हर तपासत असताना या रिव्हॉल्व्हर मधील गोळी सुटून उमेश यांना लागली. तपासा दरम्यान पोलिसांना उमेशच्या घरामध्ये तीन रिव्हॉल्व्हर, आठ तलवारी, दोन चोपर, तेरा काडतुसे देखील सापडली. या तिन्ही रिव्हॉल्वर बेकादेशीर आहेत. घटना घडल्यानंतर पोलिसाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
टिटवाळा पोलिसांनी या प्रकरणी जखमी उमेश साळुंखे ,मुलगा शुंभम साळुंखे ,नोकर राम सिंग ,शिंदे नावाच्या इसमा विरोधात गुन्हा दाखल केला . या तिन्ही रिवाल्वर ,तलवारी व चोपर कशासाठी आणि कोठून आणले होते याचा तपास आता पोलीस करत आहेत.
कल्याण जवळ असलेल्या टिटवाळा परिसरात एका ठेकेदारावर गोळीबार झाल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली होती.. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.. जखमी झालेल्या ठेकेदार उमेश साळुंखे याला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.. सुरुवातीला अज्ञात इसमानी गोळीबार केल्याचे सांगत पोलीस तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी सीसीटिव्ही तपासले . त्यातून धक्कादायक प्रकार समोर आला. रविवारी रात्रीच्या सुमारास ठेकेदार उमेश साळुंखे व त्याचा मित्र शिंदे नावाचा मित्र हे घराजवळ शेडमध्ये बसले होते.
शिंदे यांनी उमेश यांच्याकडून रिव्हॉल्वर घेतली . रिव्हॉल्वर तपासत असताना रिव्हॉल्वर मधील गोळी सुटून उमेश साळुंखे यांना लागली. घडलेला प्रकार लपवण्यासाठी गोळीबार करण्यात आल्याची सांगत पोलिसांची दिशाभूल करण्यात आली. पोलिसांनी या घराची झडती घेतली असता घरामध्ये तीन रिव्हॉल्वर, तेरा काडतूस, आठ तलवारी दोन चोपर हस्तगत करण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पाहून पोलीस देखील चक्रावलेत.