बदलापूरच्या मांजर्ली परिसरात गॅसची पाईपलाईन फुटली, परिसरात भीतीचे वातावरण
By पंकज पाटील | Published: July 27, 2024 04:48 PM2024-07-27T16:48:19+5:302024-07-27T16:49:06+5:30
या घटनेमुळे परिसरात काहीकाळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बदलापूर : बदलापूरच्या मांजर्ली परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना गॅसची पाईपलाईन फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात काहीकाळ गोंधळाचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत गॅस पुरवठा बंद केला.
मांजर्ली परिसरात काँक्रीट रस्त्याचं काम सुरू असताना जेसीबीद्वारे खोदकाम करताना अचानक गॅसची पाईपलाईन फुटली. यामुळे मोठ्या प्रमाणात गॅसची गळती सुरू झाली. संपूर्ण परिसरात गॅसचा वास पसरल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, याबाबतची माहिती मिळताच महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत गॅसचा पुरवठा बंद केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. दरम्यान रस्त्याच्या खाली गॅस लाईन असताना देखील पालिकेचे ठेकेदार जबाबदारीने काम करीत नसल्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे समोर येत आहे.