आगीचे सत्र सुरूच, डोंबिवलीत भंगार सामानाच्या गोदामाला भीषण आग
By प्रशांत माने | Published: March 21, 2024 03:52 PM2024-03-21T15:52:33+5:302024-03-21T15:52:51+5:30
दिड ते दोन एकराच्या मोकळ्या भूखंडावर ठिकठिकाणी पत्र्याचे कंपाऊंड टाकून त्यात मोठ्या प्रमाणात भंगार सामानाचा साठा केला गेला आहे. रात्री दिडच्या सुमारास आग लागल्याची घटना घडतात तत्काळ अग्निशमन विभागाला कळविण्यात आले.
डोंबिवली: कल्याण मधील पोलिस वसाहतीमधील भंगार अवस्थेतील दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना आग लागल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवली पूर्वेतील गोळवली, देशमुख होम्स च्या मागील बाजूस असलेल्या भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास घडली आहे. सकाळी सातच्या सुमारास आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
दिड ते दोन एकराच्या मोकळ्या भूखंडावर ठिकठिकाणी पत्र्याचे कंपाऊंड टाकून त्यात मोठ्या प्रमाणात भंगार सामानाचा साठा केला गेला आहे. रात्री दिडच्या सुमारास आग लागल्याची घटना घडतात तत्काळ अग्निशमन विभागाला कळविण्यात आले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने एकामागोमाग असे अग्निशमन चे नऊ बंब आणि पाण्याचे दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण आणण्यात सहा तासांहून अधिक कालावधी लागला. आग लागलेल्या ठिकाणी अजूनही धूर बाहेर पडत असून पुर्णपणे आग विझवण्यासाठी आणखीन काही वेळ लागेल अशी माहिती अग्निशमन अधिकारी दामोदर वांगड यांनी दिली.