कल्याणच्या पत्रीपुलाजवळ होणा-या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी संयुक्त पाहणी
By अनिकेत घमंडी | Published: April 3, 2024 08:45 PM2024-04-03T20:45:19+5:302024-04-03T20:45:31+5:30
महापालिका, एमएसआरडीसी व शहर वाहतूक शाखा अधिका-यांची संयुक्त पाहणी.
डोंबिवली: महानगरपालिका क्षेत्रातून जाणारा कल्याण शिळ रस्ता हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अखत्यारित आहे. सदर रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम एमएसआरडीसी मार्फत सुरू असून यातील कल्याण येथील पत्रीपुलाला जोडणाऱ्या पोहोच रस्त्यांचे काम नुकतेच एमएसआरडीसी ने सुरु केले आहे. सदर कामामुळे या ठिकाणी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याबाबत तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्याने याबाबतीत सर्व संबंधितांसोबत संयुक्त पाहणी करून उपाययोजना करण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज या सदर ठिकाणी महापालिका, एमएसआरडीसी व शहर वाहतूक शाखा अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी केली.
एमएसआरडीसी मार्फत कल्याण शहरातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे बहुतांश काम झालेले असून ज्या भागातील रस्त्याची कामे अपुर्ण आहेत ती हाती घेण्यात आलेली आहेत. पत्रीपुलाच्या उतारावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असल्याने पावसाळयापुर्वी पुढील एक ते दीड महिन्याच्या कालावधीत काँक्रिटीकरण करण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी एमएसआरडीसी कडून देण्यात आली. तसेच येथील प्रचंड रहदारीमुळे फक्त रात्री १२.०० ते सकाळी ५.०० वाजेपर्यंत काम करण्यास अनुमती असल्याने कामाचा वेग ठेवण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पाहणी दरम्यान झालेल्या चर्चेनुसार या ठिकाणी एकूण चार मार्गांचे काम असून पहिला मार्ग अंतिम टप्प्यात आहे तसेच उरलेल्या तीन मार्गांची कामे ३० एप्रिल पूर्वी पूर्ण करणे बाबत सूचना संबंधित अभियंता व ठेकेदार यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर कामाचा वेग तातडीने वाढविणे, कामासाठी रात्री १०.०० ते सकाळी ८.०० वाजेपर्यंत एमएसआरडीसीला अनुमती देणे व वाहतुक कोंडीचे योग्य नियोजन करण्याच्या दृष्टीने वाढीव १५ ते २० ट्रॅफिक वॉर्डन शहर वाहतूक शाखेत उपलब्ध करण्याबाबत सूचना महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी संबंधिताना दिल्या.
सदर ठिकाणी असलेल्या खड्डयांमुळे वाहतुकीस होणारा त्रास कायमस्वरूपी दूर करण्याच्या दृष्टीने हे काम होणे आवश्यक असल्याने त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे व अशा आशयाच्या आवाहनाचे सुचना फलक लावण्याच्या सूचना महापालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी यांनी एमएसआरडीचे कार्यकारी अभियंता यांना दिल्या.
सदर पाहणी दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता अनिरुध्द बोर्डे, शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शिरसाट व त्यांचे प्रतिनिधी तसेच साकेत इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर गुरमे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.