कल्याणमधील इमारतीमध्ये घुसला बिबट्या; सात तासापासून जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू
By मुरलीधर भवार | Published: November 24, 2022 04:04 PM2022-11-24T16:04:17+5:302022-11-24T16:06:00+5:30
आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास श्रीराम अनुग्रह या इमारतीमध्ये बिबट्या शिरल्याचे कळतात नागरिकांमध्ये एकच धावपळ माजली आणि भीतीचे वातावरण पसरले.
कल्याण : कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा परिसरातील श्रीराम अनुग्रह या इमारतीत आज सकाळी बिबट्या शिरल्याने एकच खळबळ उडाली. या इमारतीत राहणारे नागरिक या घटनेमुळे हवालदार झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन खाते अग्निशमन दल आणि विविध प्राणी मित्र संघटना यांच्या मदतीने गेल्या सात तासापासून प्रयत्न सुरू आहेत मात्र अद्याप बिबट्याला जेरबंद करण्यात आलेले नाही. हे रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली आहे.
आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास श्रीराम अनुग्रह या इमारतीमध्ये बिबट्या शिरल्याचे कळतात नागरिकांमध्ये एकच धावपळ माजली आणि भीतीचे वातावरण पसरले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि वन खात्याचे अधिकारी यांनी धाव घेतली बिबट्या हा इमारतीच्या जिन्यात दबा धरून बसला आहे. त्याला जेर बंद करण्यासाठी बंद दराच्या आडून नागरिक दारे ठीटावीत आहेत. वन खात्याने फटाके फोडून त्याला जिन्यामधून त्याची जागा बदलण्याचा प्रयत्न केला मात्र तो एका मधून दुसऱ्यांमध्ये गेल्याचे कळाले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पथकही शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. बिबट्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध केल्यावर त्याला जेरबंद करण्यात येईल असे रेस्क्यू पथकाकडून सांगण्यात आले. हा बिबट्या मलंगडाच्या डोंगररांगातून पहाटेच्या वेळेस कल्याण पूर्व भागात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी या दोन्ही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बिबट्याला जेर बंद करण्याचे प्रयत्न अजूनही सुरूच आहेत.