माणसाने नुसतेच जगू नये, जगताना कर्तृत्व गाजवावे - आप्पा परब
By प्रशांत माने | Published: December 18, 2022 11:49 PM2022-12-18T23:49:59+5:302022-12-18T23:50:52+5:30
परब यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डोंबिवली : कसे जगावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले, कसे मरावे हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवले, तर उत्तरेकडून आलेले हिरवे कसे रोखावे हे राणी ताराबाई यांनी शिकवले. त्यामुळे नुसते जगण्यापेक्षा काहीतरी कर्तृत्व करुन जगा असे प्रतिपादन दुर्गसंशोधक लेखक बाळकृष्ण उर्फ आप्पा परब यांनी रविवारी डोंबिवलीत केले.
परब यांना चतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सावित्रीबाई फुले कलामंदिरात पार पडलेल्या चतुरंगच्या 32 व्या रंगसंमेलनात परब यांना जीवनगौरव पुरस्काराने दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख पोलिस आयुक्त सदानंद दाते यांच्याहस्ते गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, रोख रक्कम आणि शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी परबांच्या पत्नी अनुराधा या देखील उपस्थित होत्या.
परब पुढे म्हणाले शिवाजी महाराजांची दुरदृष्टी समजून घेण्यासाठी तुमचा दृष्टिकोन सुक्ष्मदर्शी असावा. पाठांतरात मोठी शक्ति आहे हे सांगताना त्यांनी मुलांना पाठांतराची सवय लावा हे त्यांनी अपार असावे पाठांतर... संधीतची असावा विचार असे सुभाषितद्वारे कवी भूषण यांचे शिवाजी महाराजांवरील काव्य आपल्या मुलांकडून पाठांतर करून घ्यावे असा सल्ला त्यांनी दिला. स्त्री ही क्षणाची पत्नी तर अनंत काळाची माता असते हे मनाशी ठरवून प्रपंच ठरविला पाहिजे याकडे ही त्यांनी लक्ष वेधले.
तर इतक्या मोठ्या व्रतस्थ
व्यक्तीला आपल्या हस्ते पुरस्कार दिला गेला हे आपले भाग्य असल्याचे सदानंद दाते यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी मराठी संस्कृतीचा अभिमान टिकविण्याचे सर्वाधिक प्रयत्न याच शहरात झाल्याचे सांगत डोंबिवली शहराचा गौरव केला. प्रत्येकाकडे गुणाची एक खाण असल्याचे म्हणताना समृद्धीकडून सार्थकाकडे जाण्यासाठी समृद्ध समाज आणि सार्थक व्यक्ती निर्माण करण्याची प्रेरणा आप्पांच्या जीवनातून मिळत असल्याचे सांगत त्यांनी आप्पांच्या कार्याला वंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ समीरा गुजर यांनी केले.