कचरा व्यवस्थापन  क्षेत्रातील भव्य यशाचे प्रारूप; वैशाली स्वरूप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 08:18 AM2023-10-16T08:18:29+5:302023-10-16T08:18:55+5:30

वैशाली यांनी २०१०च्या आसपास साकीनाका येथील एमएसएमईमधून ‘गोल्ड अप्रायजल’ नावाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

A pattern of grand success in the field of waste management; Vaishali swarup | कचरा व्यवस्थापन  क्षेत्रातील भव्य यशाचे प्रारूप; वैशाली स्वरूप

कचरा व्यवस्थापन  क्षेत्रातील भव्य यशाचे प्रारूप; वैशाली स्वरूप

- सचिन सागरे
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : नाटकात अभिनय करायची आवड असल्याने विद्यापीठातल्या अनेक एकांकिकामध्ये तिने अभिनय केला. तिच्या अभिनयाचं कौतुक व्हायचे. पण, लेकीचा हा अभिनयाचा मार्ग तिच्या आईवडिलांना पसंत नव्हता. बी.ए.च्या दुसऱ्या वर्षात शिकत असतानाच तिचे लग्न लावून दिले आणि अभिनय, शिक्षण सारे काही थांबले. एकल मातृत्व नशिबी आल्यावर परिस्थितीशी दोन हात केले. प्रचंड कष्ट, अविरत संघर्ष, हार न मानण्याची वृत्ती आणि सातत्य यामुळेच पुरुषांचे प्राबल्य असणाऱ्या ई-कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील वैशाली स्वरूप पहिल्या महिला उद्योजिका ठरल्या आहेत.

वैशाली यांनी २०१०च्या आसपास साकीनाका येथील एमएसएमईमधून ‘गोल्ड अप्रायजल’ नावाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. सोन्याच्या शुद्धिकरणाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतल्यावर कुर्ला येथे शुद्धिकरणाचा कारखाना सुरू केला. दुर्दैवाने कारखाना तोट्यात गेला. यातून बाहेर पडण्यासाठी एका शैक्षणिक संस्थेत समुपदेशक म्हणून नोकरी करायला सुरुवात केली. दहा वर्षे शैक्षणिक संस्थेत काम केल्यावर कचरा व्यवस्थापन करणाऱ्या एका गुजरातच्या कंपनीत नोकरी मिळाली. संवाद कौशल्य आणि भाषेतला गोडवा यांमुळे भारतभर मार्केटिंगचे काम त्यांना करावे लागले. त्यामुळे, ई-वेस्ट रिसायकलिंग क्षेत्रातले त्यांचे ज्ञान चांगलेच वाढली. त्यानंतर त्यांनी आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. 

ई-वेस्ट रिफायनरी क्षेत्रातील त्या पहिल्या महिला उद्योजक होत्या. शिवाजी महाराजांना आदर्श मानणारी ही उद्योगिनी कधीही कोणाही पुढे न झुकता आणि लक्ष न देता फक्त स्वतःवर विश्वास ठेवून पुढे चालत राहिली. त्यामुळेच आज इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग प्रायव्हेट लिमिटेड नावाची ई-वेस्ट रिसायकलिंग अँड रिफायनरीमध्ये महाराष्ट्रातील पहिली कंपनी म्हणून नावारूपाला आली आहे. 

नवरात्रीच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या नऊ महिलांच्या कार्याची आपल्याला लोकमतच्या या सदरातून आम्ही ओळख करून देणार आहोत. यात आजपासून नऊ दिवस आपल्या भेटीला येतील वेगवेगळ्या प्रेरणादायी महिलांच्या कहाण्या...

व्याख्यानाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन 
सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून वैशाली यांना महिला उद्योजिका घडवायच्या आहेत. देशभरात ई-कचरा संकलन करणारी केंद्रे उभारण्याचादेखील त्यांचा मानस आहे. त्यादृष्टीने त्यांचे काम सुरू आहे. विद्यार्थी हे उद्याचा देश घडवत असतात. त्यामुळे, या विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यासाठी त्या व्याख्यानदेखील देतात. अनेक महाविद्यालयांतर्फे त्यांना बोलावण्यात येते. तसेच काही शाळा आणि महाविद्यालयातर्फे त्यांच्या फॅक्टरीवर उद्योग प्रशिक्षण आणि सामाजिक जागरूकता कार्यक्रम होत असतात. 

सातारा येथील माण तालुक्यात त्यांनी आपल्या काही विश्वासू लोकांच्या सहकार्याने कंपनीची स्थापना केली. लॉजिस्टिक, ऑपरेशन टीम, लॅब टेक्निशियन, मार्केटिंग अशा विभागांमध्ये काम करणारे अनेक कर्मचारी त्यांच्याकडे कार्यरत आहेत. भारतातल्या अनेक  राज्यांत त्यांचा व्यवसाय विस्तारला आहे. 

Web Title: A pattern of grand success in the field of waste management; Vaishali swarup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.