कोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेतून पडून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
By मुरलीधर भवार | Published: March 28, 2024 01:03 AM2024-03-28T01:03:23+5:302024-03-28T06:26:57+5:30
रोहित रमेश किळजे असे रेल्वे गाडीतून पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
डोंबिवली: रेल्वेतून प्रवास करीत असताना प्रचंड गर्दीमुळे दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या एका २५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा खाली पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळच्या सुमारास कोपर रेल्वे स्थानकजवळ घडली. रोहित रमेश किळजे असे रेल्वे गाडीतून पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
डोंबिवली पश्चिमेकडील मथुरा अपार्टमेंट येथे हा पोलीस कर्मचारी राहात होता. मुंबईत ताडदेव येथील शशस्त्र पोलीस मुख्यालयात त्याची ड्युटी होती. रोहितच्या पश्चात आई आणि बहिण आहे. त्याचा मृतदेह चिपळूण येथील राहत्या घरी अंतिम विधीसाठी नेण्यात आला आहे.
वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर रोहित 2018 मध्ये पोलीस खात्यात त्यांच्या जागी नोकरीला लागला होता. तो आई आणि बहिणी सह डोंबिवलीत राहत होता. ताडदेव येथे मुख्यालयात कर्तव्यावर असलेला रोहित डोंबिवली ते दादर असा लोकल ट्रेन ने प्रवास करून तिथून ताडदेवपर्यंत जात असे. बुधवारी सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांनी डोंबिवलीहून निघालेल्या जलद लोकलने तो दादरकडे निघाला होता मात्र ट्रेनमध्ये गर्दी असल्याने तो दरवाजातच उभा होता कोपर दरम्यान त्याचा हात सुटल्याने तो चालत्या लोकलमधून खाली पडला.