डाेंबिवलीत झाले दिवा भीत नावाच्या दुर्मिळ घुबडाचे दर्शन
By मुरलीधर भवार | Published: February 16, 2023 04:35 PM2023-02-16T16:35:19+5:302023-02-16T16:36:02+5:30
अतिशय दुर्मिळ घुबड ज्याला मराठीत दिवा भीत किंवा सांजशिंगी घुबड या नावाने ओळखले जाते. हाच दिवा भीत घुबड आज सकाळी डोंबिवलीतील गोपाळनगर येथे आढळून आला.
डाेंबिवली- अतिशय दुर्मिळ घुबड ज्याला मराठीत दिवा भीत किंवा सांजशिंगी घुबड या नावाने ओळखले जाते. हाच दिवा भीत घुबड आज सकाळी डोंबिवलीतील गोपाळनगर येथे आढळून आला.
या परिसरात राहणाऱ्या दुबल यांच्या गॅलरीत ताे आसऱ्याला आला हाेता. कावळे त्याच्या मागे लागले हाेते. प्लांट अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर साेसायटीचे अर्थात पॉज या प्राणीमित्र संस्थेचे संस्थापक निलेश भणगे यांना कॉल केल्यावर त्यांनी ओंकार साळुंखे या रेस्कुअरला पाठवून या दुर्मिळ घुबडाचा जीव वाचवला. त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. या घुबडाला सुखरूप निसर्गात सोडले जाईल असे भणगे यांनी सांगितले. हे घुबड कानांवर पिसे असलेले लहान, किरकोळ आणि राखट रंगाचे घुबड आहे. त्याच्या अंगावरचा रंग पिवळी झाक असलेला राखट- पिंकट, त्यावर बारीक रेखीव काळ्या रेषा.
खालील अंगाचा रंग पिवळट आणि त्यावर दाट काळ्या रेषा असतात. नर व मादी दिसायला सारखे असतात. साधारणपणे पंजाब, सिंध, महाराष्ट्र, पुणे, ठाणे, अहमदनगर आणि रत्नागिरी येथे एकेएकटे आढळून येतात. बलुचीस्थान , पाकिस्तान येथे प्रामुख्याने एप्रिल-मेमध्ये दिसून येतात. त्याचे निवासस्थान डोंगरांचा खडकाळ भाग आणि उजाड प्रदेशात आढळून येते. अतिशय दुर्मिळ हे घुबड आहे असे पक्षी निरीक्षकानी सांगितले.