वजीर सुळक्यावर श्रीरामांचे चित्र असलेला भगवा फडकविला, गिर्यारोहक संस्था सह्याद्री रॉक अॅडव्हेंचरची कामगिरी
By मुरलीधर भवार | Published: January 22, 2024 04:17 PM2024-01-22T16:17:52+5:302024-01-22T16:21:32+5:30
वजीर सुळका हा गिर्यारोहकांकरीता एक आव्हानात्मक सुळका आहे. हा सुळका ९० अंश कोनात उभा आहे.
कल्याण-अयोध्येतील श्री राम मंदीरात प्राण प्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आली. त्यासाठी देशभरात राममय वातावरण निर्मिती केली गेली. त्यात कल्याणची गिर्यारोहक संस्था सह्याद्री रॉक अॅडव्हेंचर हीदेखील कुठेही मागे नव्हती. त्यांच्या परीने त्यांनी सर्वात कठीण असलेल्या वजीर सुळका सर करुन त्यावर श्री रामाचे चित्र असलेला भगवा फडकविला.
वजीर सुळका हा गिर्यारोहकांकरीता एक आव्हानात्मक सुळका आहे. हा सुळका ९० अंश कोनात उभा आहे. ३०० फूट उंच असलेला या सुळक्याच्या माथा सर करुन त्याठिकाणी श्री रामाचे चित्र असलेला भगवा फडकविण्यात आला. वांद्रे गावातून गिर्यारोणाची सुरुवात करण्यात आली. या सुळक्याच्या पायथ्याशी श्री रामाची विधिवत पूजा करुनच सुळक्यावर चढाईला सुरुवात केली. शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारी ही मोहीम कल्याणकरांच्या चमूसाठी अविस्मरणीय ठरली.
बुद्धिबळाच्या पटावर जसा वजीर मांडावा तसा हा सुळका दिमाखात उभा आहे. नजर टाकली तरी हा सुळका अंगाला दरदरून फोडतो. चढाई करताना थोडी जरी चूक झाली की जीवाला मुकावे लागते. अशी कठीण चढाई करण्यात आली. या मोहिमेत गिर्यारोहक पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, सुहास जाधव, सुनील खनसे, अभिजीत कळंबे, स्वप्नील भोईर, प्रशील अंबादे, राहुल घुगे यांनी सहभाग घेतला.