बुटाच्या शो-रूमला तर कुठे पुठ्ठयांच्या गोदामाला आग; नववर्षाच्या सुरूवातीलाच डोंबिवलीत आगीच्या दोन घटना
By प्रशांत माने | Published: January 1, 2024 06:22 PM2024-01-01T18:22:51+5:302024-01-01T18:23:38+5:30
सोमवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील बुटाच्या शो-रूम ला आग लागली.
डोंबिवली: नववर्षाच्या सुरूवातीलाच सोमवारी डोंबिवली पुर्वेकडील भागात दोन आगीच्या घटना घडल्या. केळकर रोडवरील एका बुटाच्या शो-रूम ला तर सोनारपाडा परिसरातील एका पुठ्ठयांच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवतीहानी झालेली नाही परंतू मालमत्तेचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
सोमवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील बुटाच्या शो-रूम ला आग लागली. आग लागली तेव्हा शो-रूम बंद होते. आतमधून धूर बाहेर येऊ लागल्याने लागलीच परिसरातील नागरिकांनी ही माहिती डोंबिवली अग्निशमन केंद्राला कळविली. अग्निशमन बंबाने घटनास्थळी धाव घेत शो-रूम चे बंद शटरचे लॉक तोडले आणि काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळविले. दुसरी आगीची घटना सोनारपाडा परिसरात दुपारी पावणे दोन च्या सुमारास घडली. कल्याण-शीळ मार्गावरील क्लासिक हॉटेल मागील भागात असलेल्या पुठ्ठयांच्या गोदामाला आग लागली. याचीही माहीती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तत्परतेने दोन बंब आणि पाण्याच्या टँकरसह दाखल झाले. गोदामात पुठ्ठयांचे ढिगारे असल्याने आगीचे प्रमाण काहीसे वाढले होते. परंतू तासाभरात या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले अशी माहिती केडीएमसीचे डोंबिवली अग्निशमन केंद्र प्रमुख विनायक लोखंडे यांनी दिली.