एक चिंगारी करू शकते नुकसान भारी! अग्निशमनबाबत कल्याणात सायकल रॅलीद्वारे जनजागृती
By प्रशांत माने | Updated: April 6, 2025 11:46 IST2025-04-06T11:45:56+5:302025-04-06T11:46:28+5:30
रविवारी अग्निशमन विभागातर्फे सायकल रॅली काढण्यात आली

एक चिंगारी करू शकते नुकसान भारी! अग्निशमनबाबत कल्याणात सायकल रॅलीद्वारे जनजागृती
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: १४ ते २० एप्रिल हा सर्वत्र अग्निशमन सप्ताह पाळला जातो. परंतू केडीएमसीने त्याआधीच मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली गृहसंकुल, शाळांसह, मनपाच्या विविध विभागातील कर्मचा-यांमध्ये अग्निशमनबाबत जनजागृती सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाढत्या आगीच्या घटना रोखण्यासह त्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी रविवारी अग्निशमन विभागातर्फे सायकल रॅली काढली होती.
केडीएमसीचे सायकल उपक्रमाचे नोडल अधिकारी प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या सायकल रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला. महापालिकेचे उपायुक्त संजय जाधव, ब्रँड ॲम्बेसेडर डॉ. प्रशांत पाटील, आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू दिलीप घाडगे यांनी रॅलीला झेंडा दाखविला. रॅलीमध्ये कल्याण सायकलिस्ट असोसिएशन, कल्याण पूर्व सायकलिस्ट असोसिएशन, डोंबिवली सायकलिस्ट असोसिएशन, पलावा सायकलिस्ट असोसिएशन, हिरकणी सायकल ग्रुप आदी सायकल संघटनांच्या २०० सदस्यांसह अनेक हौशी सायकलपटूही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यामध्ये प्रोफेशनल सायकलिस्टसोबतच महिला आणि विद्यार्थी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.
...तर लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा
आपातकालीन परिस्थितीत लिफ्टऐवजी जिन्याच्या वापर करा, आपली सुरक्षा आपला अधिकार, एक चिंगारी करू शकते नुकसान भारी, इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा सतत कार्यान्वित ठेवा असे जनजागृतीपर फलक रॅलीतील सायकलवर लावले होते.
अग्निशमन मुख्यालय परिसरात समारोप
कल्याण पश्चिमेतील आधारवाडी अग्निशमन मुख्यालयापासून सुरू झालेली रॅली लालचौकी, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, मुरबाड रोड, बिर्ला कॉलेज, खडकपाडा, आधारवाडी चौक, पुन्हा अग्निशमन मुख्यालय अशी काढली होती. अग्निशमन विभागाने एक माहिती पुस्तिका तयार केली असून त्यात अग्नीसुरक्षेबाबत सखोल माहिती दिली आहे. या पुस्तकांच्या ५ हजार प्रती छापल्या असून लवकरच शहरातील रहिवासी सोसायटयांमध्ये त्याचे वाटप होणार आहे अशी माहिती अग्निशमन विभागाचे अधिकारी चौधरी यांनी दिली.
उच्च प्रतीची इलेक्ट्रीक वायर वापरा
आग लागल्यास १०१ क्रमांकावर संपर्क करावा, लिफ्टचा वापर करू नये जिन्याचा वापर करावा, आगीमुळे धुर वाढल्यास टॉवेल आणि रूमाल ओला करून चेह-यावर लावावा, घरात उच्च प्रतीची वायर वापरावी, अग्निशमन उपकरणांची माहीती रहिवाशांना असावी असे आवाहन मनपा सायकल उपक्रमाचे नोडल अधिकारी तथा विदयुत विभागाचे कार्यकारी अभियंता भागवत यांनी केले.