डोंबिवलीतील तरुणाईचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर खास गीत
By सचिन सागरे | Published: February 19, 2023 04:33 PM2023-02-19T16:33:11+5:302023-02-19T16:34:12+5:30
गाणं तयार करणाऱ्या तरुणांनी फूड डिलिव्हरी केली अन् मिनरल वॉटरचा टेम्पो चालवून पैसे जमा केले.
सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: शिवाजी महाराज हे निव्वळ दैवत नसून अवघ्या मराठी जनांचे आदर्श आहेत. महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केलं तोच आदर्श डोळ्यासमोर ठेवून डोंबिवलीतील काही तरुणांनी एकत्र येत पहिलं वहिलं गीत तयार केलं ते देखील महाराजांवर. विशेष म्हणजे, हे गाणं तयार करणाऱ्या तरुणांनी फूड डिलिव्हरी केली तर, मिनरल वॉटरचा टेम्पो चालवून पैसे जमा केले. अशी सगळी भट्टी जमून या तरुणांनी हे गीत तयार केले. ही सगळी मुले २० ते २६ या वयोगटातली आहेत. कलाक्षेत्रात सांघिक रुपाने नवोदित युवा कलाकारांची ही पहिलीच कलाकृती आहे.
या गाण्याचे गीतकार आणि दिग्दर्शक व्यंकटेश गावडे याने फूड डिलिव्हरी करून गाणं रेकॉर्ड करण्यासाठी पैसे जमवले. रोहित आयरे हा उत्तम सिनेमॅटोग्राफर असताना देखील आर्थिक आधारासाठी मिनरल वॉटरचा टेम्पो चालवतो. यातील काही या क्षेत्रात छोट्या मोठ्या भूमिका करतात. तर काही मालिकेमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम शिकतात.
श्रीकांत पंडित व श्रद्धा हिंदळकर या गायकांनी हे गीत गायले असून संदीप पालेकर यांनी स्वरबद्ध केले आहे. आयरे यांनी गीताचे चित्रण केले असून प्रतिक फणसे यांनी संकलन केले आहे. गणेश गुरव, नयन दळवी, पूजा मौली, अमरजा गोडबोले या कलाकारांवर हे गीत चित्रीत झाले आहे. स्वराज्याचे सुराज्य कसे घडेल यासाठी आजच्या तरुणाने महाराजांचे कोणते विचार अंगिकारले पाहिजे याचे चित्रीकरण या गाण्यात केलेले आहे.
मागील तीन वर्षांपासून या गाण्यासाठी निर्माता शोधत होतो. परंतु, नवीन मुलं अनुभव नाही. म्हणून, कुणी तयार झालं नव्हतं. हर्षद सुर्वे आणि युवराज सनस यांनी विश्वास दाखवला आणि त्यामुळेच या गाण्याची निर्मिती झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘राजे दैवत हो’ हे शिवगीत नुकतेच प्रदर्शित झाले. महाराजांचा इतिहास आजच्या पिढीला त्यांना समजणाऱ्या समाज माध्यमातून कळावा हा या गीताचा उद्देश असल्याचे दिग्दर्शक गावडे यांनी सांगितले.