महावितरणच्या कल्याण एकमधील विशेष पथकाने पकडली १ कोटी ४३ लाखांची वीजचोरी
By अनिकेत घमंडी | Published: April 21, 2023 05:01 PM2023-04-21T17:01:04+5:302023-04-21T17:01:39+5:30
या तपासणीत मीटरमध्ये छेडछाड, रात्रीच्या कालावधीत मीटर बायपास तसेच चेंज ओव्हर स्वीच वापरून ३८ जणांकडून सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आणली.
डोंबिवली: कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत उच्चदाब ग्राहकांच्या (थ्री-फेज) वीज पुरवठा तपासणीसाठी स्थापित विशेष पथकाने गेल्या दोन महिन्यात तब्बत १ कोटी ४३ लाख रुपयांच्या ३८ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. यातील २९ उच्चदाब ग्राहकांकडून वीजचोरीच्या देयकांचे १ कोटी १७ लाख रुपये वसूल करण्यात आले असून दोंघाविरुद्ध पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांच्या संकल्पनेतून परिमंडलातील कल्याण एक, कल्याण दोन, वसई आणि पालघर या चारही मंडल कार्यालयांतर्गत उच्चदाब ग्राहकांच्या तपासणीसाठी नियमित कर्मचाऱ्यांची विशेष पथके स्थापन करण्यात आली आहेत. कल्याण मंडल कार्यालय एकच्या विशेष पथकाने उमेशनगर, हाजीमलंग, गौरीपाडा, नेतीवली, खंबालपाडा, सोनारपाडा, सागाव, रेतीबंदर, पारनाका आदी भागात वीज वापराच्या माहितीचे विश्लेषण व इतर स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासणी केली.
या तपासणीत मीटरमध्ये छेडछाड, रात्रीच्या कालावधीत मीटर बायपास तसेच चेंज ओव्हर स्वीच वापरून ३८ जणांकडून सुरू असलेली वीजचोरी उघडकीस आणली. तर यातील २९ जणांकडून वीजचोरीच्या देयकाचे १ कोटी १७ लाख रुपये याशिवाय १२ जणांकडून १४ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढेही विशेष पथकांच्या कारवाया नियमितपणे सुरू राहणार असून कोणतीही युक्ती वापरून वीजचोरीचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई अटळ असल्याची माहिती महावितरणने दिली आहे. मुख्य अभियंता औंढेकर व अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता जयश्री भोईर, सहायक अभियंते सुरज माकोडे, संतोष मुर्तरकर यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.