रेल्वेचा अजब कारभार, जुलैनंतर करणार डोंबिवली स्थानकातील अर्ध्या छताचे काम!
By अनिकेत घमंडी | Published: June 6, 2024 01:47 PM2024-06-06T13:47:36+5:302024-06-06T13:48:04+5:30
ट्विट करून प्रवाशाला दिलं उत्तर, डोंबिवलीकरांचा यंदाचा प्रवासही भर पावसातच
अनिकेत घमंडी, डोंबिवली: सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या डोंबिवलीरेल्वे स्थानकात फलाट ५ वर पाच वर्षे अर्धवट शेड आहे, प्रवाशांनी वेळोवेळी तक्रारी।केल्या, केंद्राच्या यात्री उपभोक्ता समितीने त्याबाबत सातत्याने आवाज उठवला मात्र रेल्वे प्रशासन त्यावर काहीही प्रतिक्रिया न देता करू, बघू अशी थंड भूमिका घेऊन प्रवाशांच्या तक्रारीला केराची टोपली दाखवत आहे.
आता तर जुलै नंतर बघू असे म्हणत रेल्वेने प्रवाशांची थट्टा केली असल्याचा संताप कौस्तुभ देशपांडे याने व्यक्त केला. कौस्तुभने याबाबत बुधवारी रेल्वे प्रशासनाला ट्विट करून फलाट ५ ची समस्या मांडली होती, त्यावर रेल्वेने उत्तर देत आता जुलै नंतर त्या कामाचे बघू असे प्रतिउत्तर दिल्याने त्याने संताप व्यक्त।केला. रेल्वेचे स्टेशन मास्तर झोपा काढतात की काय असा सवाल करत त्याने रेल्वेला काम का झाले नाही याचा जाब विचारला आहे. म्हणजे यंदाही प्रवाशांनी पावसात भिजत प्रवास करायचा का? त्या गडबडीत एखाद्याचा रेल्वे अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल करत त्याने रेल्वे प्रशासनाला पुन्हा प्रतिउत्तर देत सवालांचा भडिमार केला.
प्रवाशांप्रति सुविधा देताना हात आखडता का घेता, दैनंदिन लोकल गाड्या लेट चालवत आहात त्याचे काही वाटत नाहीच, पण आता फलाटात उभं राहताना तरी सुविधा द्या असा सवाल करत त्याने रेल्वे अधिकारी बेजबाबदार असल्याचे म्हंटले.