Kalyan: कल्याणमध्ये इमारतीला लागलेली भीषण आग आटोक्यात, रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण
By मुरलीधर भवार | Published: November 15, 2023 09:56 PM2023-11-15T21:56:32+5:302023-11-15T21:56:59+5:30
Kalyan Building Fire: कल्याण शहराच्या पश्चिम भागातील खडकपाडा परिसरातील अमृत हेवन इमारतीमधील दहाव्या मजल्यावरील एका घराला आज रात्री आठ वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण - कल्याण शहराच्या पश्चिम भागातील खडकपाडा परिसरातील अमृत हेवन इमारतीमधील दहाव्या मजल्यावरील एका
घराला आज रात्री आठ वाजता अचानक आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याचे कळताच इमारतीमधील नागरीकांनी इमारतीच्या बाहेर धाव घेतली. आगीत दहाव्या मजल्यावरील घर जळून खाक झाले आहे. या घटनेत सुदैवाने जिवित हानी झालेली नाही. घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या गाड्यांनी धाव घेऊन तातडीने आग विझविण्याचे काम केले. तासाभरानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील घराला आग लागली. इमारतीच्या रहिवासीयांनी सांगितले की, ज्या घराला आग लागली त्या घरातील रहिवासी हे सणा निमित्त घराबाहेर होते. त्यामुळे त्यात जिवीत हानी झालेील नाही. आग कशामुळे लागली असल्याचे कारण अग्नीशमन दलाकडून सांगण्यात आले नाही. मात्र नागरीकांनी सांगितले की, दिवाळीचा फटाके घरातील ग’लरीवर पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा. त्याची ठिणगी उडून ती दहाव्या मजल्यावरील घराच्या ग’लरीतील पडद्यावर पडली असावी. त्यातून ही आग लागली असावी. ही ठिकणी आकराव्या मजल्यावरील घरातून खाली दहाव्या मजल्यावरील घरावर पडल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. ११ व्या मजल्यावरील घरही धुराने कोंडले होते. आग लागल्याचे कळताच नागरीकांनी भिती पोटी घराच्या बाहेर धाव घेतली. इमारतीच्या आवारात लोक जमले होते.
आग इतरत्र पसरु नये यासाठी अग्नीशमन दलाने तातडीने बंबाद्वारे पाण्याचा फवारा सुरु केला. तसेच इमारतीचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. इमारतीतील प्रत्येक रहिवासी एकमेकांना तुम्ही सुखरुप आहात ना अशी विचारपूस करीत होता. आज भाऊ बीजेचा सण असल्याने अनेकांच्या घरी आनंदाचे वातावरण होते. इमारतीली नागरीक फेस्टीवल मूडमध्ये होते. मात्र आगीने त्यांच्या आनंदाचा हिरमोड केला. आसपासच्या इमारतीली नागरीकांनीही अमृत हेवन इमारतीच्या ठिकाणी गर्दी करुन त्याठिकाणी राहणाऱ््या नागरीकांची विचारपूस केली. अग्नीशन दलाच्या जवानांनी इमारतीच्या दहाव्या मजल्यावर दोन्ही बाजूने पाण्याचा जोरदार फवारा मारुन आग आटोक्या आणली. त्यानंतर इमारतीचा वीज पुरवठा सुरळित करण्यात आला.
इमारतीमधील वयोवृद्ध आणि आजारी नागरीक इमारतीच्या तळ मजल्याच्या आवारात येऊन खाली बसले होते. अन्य नागरीकांनी त्यांना दिलासा दिला. इमारतीमधील अग्नीशमन यंत्रणा लवकर सुरु होत नव्हती. त्यामुळे अग्नीशमन दलाच्या जवानांना सुरुवातीला थोडे जास्तीचे प्रयत्न करावे लागले.