भाजप आमदारांची बदनामी करणारा व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 11:48 AM2023-06-20T11:48:47+5:302023-06-20T11:49:03+5:30
आमदारांनी अधिकाऱ्यांना नालेसफाईच्या कामाची पाहणी करून चांगलेच धारेवर धरले.
कल्याण : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा ओरिजनल व्हिडीओ एडिट करून त्यात कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज टाकला आहे. आमदारांची खिल्ली उडवून बदनामी केली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. याप्रकरणी भाजपने कोळसेवाडी पाेलिस ठाण्यात धाव घेतली आहे. सोशल मीडियावर आमदारांची बदनामी करणाऱ्यास अटक करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
आमदारांनी अधिकाऱ्यांना नालेसफाईच्या कामाची पाहणी करून चांगलेच धारेवर धरले. यावेळी आमदार अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असल्याचा व्हिडीओ एडिट करून त्यात कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज टाकला आहे. हा व्हिडीओ व्हायरल करून आमदारांची खिल्ली उडविली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत भाजप पदाधिकारी संजय मोरे, प्रमिला जाधव, गुड्डू खान, सौरभ सिंग यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक सुनील गवळी यांना भाजप शिष्टमंडळाने निवेदन दिले. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कारवाईची मागणी
आमदारांची बदनामी करणाऱ्यांना त्वरित अटक करण्यात यावी. या बदनामीमागे राजकीय विरोधक असल्याचा आरोप भाजपने केला आहे. यासंदर्भात पोलिस निरीक्षक गवळी यांनी सांगितले की, भाजपचे निवेदन मिळाले आहे. चौकशी करून कायदेशीर कारवाई केली जाईल.