संतापलेल्या आमदारांनी सर्व्हेअरला दिले कायद्याचे धडे; भाजप आमदारांचा व्हिडीओ व्हायरल
By मुरलीधर भवार | Published: January 14, 2023 05:34 PM2023-01-14T17:34:41+5:302023-01-14T17:34:55+5:30
भाजप आमदार गणपतराव गायकवाड यांनी सर्व्हेअरला कायद्याचे धडे दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कल्याण : जागेचा वाद न्यायप्रविष्ट असताना सर्व्हेअरने सर्व्हे सुरु केला. जेव्हा भाजप आमदाराने फोनवर जाब विचारला तेव्हा आमदारांनाही उलटसूलट उत्तरे दिली. अखेर आमदारांनी अधिकाऱ्यांसमोर येऊनच त्यांना कायद्याचे धडे दिले. संतप्त भाजप आमदारांचा हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. कल्याण ग्रामीणमधील वसार गावात ही घटना घडली आहे.
कल्याण ग्रामीणमधील वसार गावात पाईपलाईनला लागून एका शेतकऱ्याची जागा आहे. या जागेच्या मालकी हक्कावरुन न्यायालयात खटला न्यायप्रविष्ट आहे. जागेच्या सर्व्हेसाठी सर्व्हेअर करुन सव्रेचा निर्णय घेतला गेला. शेतकऱ्याने या सर्वेविरोधात संबंधित विभागाला कायदेशीर नोटिस बजावली. हे सर्व असताना शनिवारी सर्व्हेअर जागेच्या मोजणीसाठी आला. ही माहिती मिळताच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी अधिकाऱ्याला फोन करुन जाब विचारला. अधिकाऱ्याने उलटसूलट उत्तर दिले. त्यानंतर थेट भाजप आमदार गायकवाड हे घटनास्थळी पोहचले. त्या अधिकाऱ्याला धारेवर धरले. गायकवाड यांचे म्हणणे आहे की, प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सर्व्हेअर याने प्रत्यक्ष जागी पंचनामा केला पाहिजे. त्याचा रिपोर्ट दिला पाहिजे. परंतु अधिकाऱ्याने असे न करता थेट सर्वे केला. नियमबाह्य काम करणे चुकीचे आहे. यासाठी मी त्या ठिकाणी गेलो.