बँकेचे एटीएम फोडणारा सुशिक्षित चोरटा गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 09:15 AM2022-03-29T09:15:01+5:302022-03-29T09:15:23+5:30
ड्रील मशीनच्या आवाजामुळे छडा
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मानपाडा परिसरातील ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडून त्यातील रक्कम चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला मानपाडा पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री अटक केली. राहुल चोरडीया (३५, रा. इंदौर, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे त्याचे शिक्षण एम. कॉम.पर्यंत झालेले असून, तो आधी एटीएम मशीनमध्ये रोख रक्कम लोड-अनलोड करणाऱ्या इंदौर येथील सिसको कंपनीत काम करत होता. तेथे त्याने एटीएम मशीन उघडण्याचे तंत्र अवगत केले होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सर्जेराव पाटील, पोलीस हवालदार राजेंद्र खिल्लारे, विजय कोळी, पोलीस नाईक दीपक गडगे, भारत कांदळकर, महादेव पवार, यल्लपा पाटील, महेंद्र मंझा आणि तिडके आदी मानपाडा पोलिसांचे पथक शनिवारी मध्यरात्री मानपाडा सर्कल परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना त्या परिसरातील शटर बंद असलेल्या ॲक्सिस बँकेच्या एटीएम सेंटरमधून ड्रील मशीनचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी शटर बाहेरून ठोठावले असता, ड्रील मशीनचा आवाज बंद झाला. यावेळी संशय बळावल्याने पोलिसांनी शटर उघडले असता, आतील व्यक्तीने पोलिसांना धक्का मारून पळण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी तो हाणून पाडला. चोरडीया याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडील बॅगेत एटीएम फोडण्यासाठी आणलेले ड्रील मशीन, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, कटावणी, होल्डर पिन, एमसील असे साहित्य आढळले.
४ एप्रिलपर्यंत कोठडी
चोरडीया याच्याविरोधात मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, त्याने इतर ठिकाणी अशाप्रकारे चोरी केली आहे का, याचा तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली. त्याला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.