घर बांधून ठेवण्याचे कार्य स्त्री करते, उमा आवटे पुजारी यांचे प्रतिपादन; १२० महिलांचा कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान
By अनिकेत घमंडी | Published: March 14, 2024 11:26 AM2024-03-14T11:26:13+5:302024-03-14T11:27:01+5:30
विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान हे निश्चितच प्रेरणादायी व अनुकरणीय आहे असे सांगितले.
डोंबिवली: घरातील सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडणारी महिला स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपते आणि घराला एकत्रित बांधून ठेवण्याचे कार्य करते. पुरुषांना वंशाचा दिवा म्हटले तर स्त्री ही त्या दिव्यातील वात असते आणि ती दोन्ही घरांना प्रकाश देते,असे प्रतिपादन निवृत्त प्राध्यापिका आणि लेखिका उमा आवटे पुजारी यांनी व्यक्त केले. आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था आणि छत्रपती शिक्षण मंडळाचे प्राथमिक विद्या मंदिर कल्याण पूर्व यांचे विद्यमाने आयोजित कन्यारत्न पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रसंगी त्या अध्यक्ष म्हणून उपस्थित असताना त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या शिक्षण समुपदेशक वृंदा दुर्वे यांनी आपल्या भाषणात उद्योग क्षेत्रातील महिलांचे योगदान , मिशन चांद्रयान , कोरोना लसीकरण भारत बायोटेक या आणि अशा अनेक क्षेत्रातील महिलांच्या कामगिरीचा आढावा घेतला. विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान हे निश्चितच प्रेरणादायी व अनुकरणीय आहे असे सांगितले.
घर आणि समाज यामध्ये दुहेरी भूमिका बजावणाऱ्या आजच्या महिलांनी आपली शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असे आवाहनही केले. गेली अनेक वर्षे महिला पालकांचा सन्मान करणाऱ्या आनंद कल्याणकारी संस्थेचे कौतुक किरण चौधरी यांनी केले. संतोष मथुराई संस्थेचे अध्यक्ष डॉ प्रकाश माळी यांनी आपल्या भाषणात सांगितले की फक्त एक दिवस महिलांचा सन्मान न करता तो ३६५ दिवस झाला पाहिजे हीच त्याच्या कार्याची महानता आहे" या प्रसंगी फक्त मुलगीच आहे अशा १२० महिला पालकांचा संस्थेच्या वतीने कन्यारत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच छत्रपती शिक्षण मंडळ प्राथमिक शाळेच्या ग्रंथालयास अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचे वतीने अखंड वाचनयज्ञ उपक्रमाअंतर्गत ६० पुस्तके भेट देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष हेमंत नेहते आणि शाळेच्या उपक्रमांविषयी माहिती मुख्याध्यापिका वसुधा पत्की यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रज्ञा घनघाव तर आभार प्रदर्शन मनिषा गुरव यांनी केले. उपक्रम यशस्वी होण्याकरिता डॉ योगेश जोशी , जगदीश पाटील, निता नेहते, डॉ सुनील खर्डीकर आणि संगीता खर्डीकर यांनी विशेष सहकार्य केले.