खड्ड्याने घेतला तरुण डॉक्टरचा बळी; उल्हासनगरमधील घटना, दुचाकी घसरून अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 07:01 IST2025-02-25T07:01:34+5:302025-02-25T07:01:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांनी एका तरुण डॉक्टरचा बळी घेतला आहे. डॉ. हनुमंत ...

खड्ड्याने घेतला तरुण डॉक्टरचा बळी; उल्हासनगरमधील घटना, दुचाकी घसरून अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांनी एका तरुण डॉक्टरचा बळी घेतला आहे. डॉ. हनुमंत
बाबूराव डोईफोडे असे त्यांचे नाव असून, याप्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
मध्यवर्ती रुग्णालयात गेल्या दीड वर्षापासून शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करणारे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. हनुमंत बाबूराव डोईफोडे (वय २८) हे दुचाकीवरून रविवारी दुपारी दोन वाजता रुग्णालयाकडे जात होते. रस्त्यातील खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून ते गंभीर जखमी झाले. त्यांना कल्याण येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, अति रक्तस्राव व फुफ्फुसाला मार लागल्याने मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी सहा वाजता नातेवाइकांनी मृतदेह बीड जिल्ह्यातील केजकासरी येथे अंत्यसंस्कारासाठी नेल्याची माहिती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. हनुमंत बाबूराव डोईफोडे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, सहा महिन्यांची मुलगी आहे.
मदतीपासून
खरे कुटुंब वंचित
खड्ड्यांमुळे एका तरुण डॉक्टरचा मृत्यू झाला असून, यापूर्वी असे बळी गेल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
काही वर्षांपूर्वी समाजसेवक भरत खरे यांची गाडी फॉरवर्ड लाईन चौकात घसरून ते कोमात गेले होते. मेंदू मृत झाल्यावर कुटुंबीयांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, आजपर्यंत खरे यांच्या कुटुंबाला पालिकेकडून मदत मिळाली नाही.
मृतदेह कुटुंबाकडे
रात्री त्यांचा मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात आणला. सोमवारी पहाटे शवविच्छेदन करून सकाळी सहा वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. खड्ड्यांमुळे गाडी घसरली असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सांगितले.