तरूणाला मारहाण, डोंबिवलीतील भाजपच्या माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
By प्रशांत माने | Updated: November 10, 2023 20:10 IST2023-11-10T20:10:00+5:302023-11-10T20:10:13+5:30
मारहाणीशी काहीही संबंध नसून नावे नाहक गोवली असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा

तरूणाला मारहाण, डोंबिवलीतील भाजपच्या माजी नगरसेवकासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
प्रशांत माने, लोकमत न्यूज नेटवर्क, डोंबिवली: एका २० वर्षीय तरूणाला मारहाण केल्याच्या आरोपाखाली भाजपचे माजी नगरसेवक साई शेलार, भाजपचे डोंबिवली पूर्व शहर उपाध्यक्ष राजू शेख यांच्यासह अन्य सहा ते सात जणांविरोधात दाखल तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान मारहाणीशी आमचा काहीही संबंध नाही, आमची नावे नाहक गोवली आहेत अशी प्रतिक्रिया शेलार आणि शेख यांनी दिली आहे.
प्रथमेश भालेराव याने याप्रकरणी तक्रार दिली आहे. येथील इंदिरानगर झोपडपट्टीत राहणारा प्रथमेश हा मजुरीचे काम करतो. मारहाणीचा प्रकार गुरूवारी रात्री साडेबाराच्या सुमारास पुर्वेकडील शेलारनाका, पोलिस चौकीच्या अलीकडे घडला. शेख यांनी शिवीगाळी केली. याबाबत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार करण्यासाठी प्रथमेश जात होता. त्या गोष्टीचा राग धरून साई शेलार, राजू शेख, दिपेश पाटील, अकबर शेख, निलेश पाटील, सोमनाथ, स्वप्नील व इतर ५ ते ६ जणांनी पट्टयाने, लाथबुक्यांनी मारहाण केल्याचे प्रथमेश ने तक्रारीत म्हंटले आहे. मारहाण होताना सोडविण्यासाठी भाऊ, आई, बहिण आले असता त्यांनाही धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.