आधारवाडीतील कैद्यांना पवारांच्या आत्मचरित्राचा आधार; सचिन तेंडुलकरचे चरित्र वाचण्यासही पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:17 AM2023-07-12T10:17:47+5:302023-07-12T10:17:55+5:30

शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे करणारे सार्वजनिक वाचनालयाने अनेक उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.

Aadhaar of Pawar's Autobiography to Aadhaarwadi Prisoners; Also like to read the biography of Sachin Tendulkar | आधारवाडीतील कैद्यांना पवारांच्या आत्मचरित्राचा आधार; सचिन तेंडुलकरचे चरित्र वाचण्यासही पसंती

आधारवाडीतील कैद्यांना पवारांच्या आत्मचरित्राचा आधार; सचिन तेंडुलकरचे चरित्र वाचण्यासही पसंती

googlenewsNext

सचिन सागरे

कल्याण : ‘लोक माझे सांगाती’ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मचरित्र, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचे चरित्र, सिंधूताई सपकाळ, प्रकाश आमटे आदींचा जीवनपट जाणून घेण्यात आधारवाडी कारागृहातील कैद्यांना रस आहे. आयुष्यात घडलेल्या गुन्ह्याचे प्रायश्चित घेणाऱ्या कारागृहातील बंद्यांसाठी कल्याणच्या सार्वजनिक वाचनालयाकडून पुस्तके पाठवली जात आहेत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘वाचेल तोच वाचेल’ हे ब्रीद बंदींना वाचन संस्कृतीकडे आकृष्ट करीत आहे.

शतकोत्तर हीरक महोत्सवी वर्ष साजरे करणारे सार्वजनिक वाचनालयाने अनेक उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. याच अनुषंगाने आधारवाडी कारागृहातील बंदींचा आत्मिक विकास होण्यासाठी मोफत वाचनसेवा पुरवण्याचा अनोखा उपक्रम वाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्कर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. एक लाखांपेक्षा जास्त ग्रंथसंपदा असणाऱ्या वाचनालयाच्यावतीने कैद्यांना पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शक ठरावे म्हणून कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र व दिवाळी अंक पुरविण्यात आले आहेत. त्यांच्या मागणीनुसार दर १५ दिवसांनी पुस्तके दिली जातात. आतापर्यंत, वाचनालयाने विविध लेखकांची २०० पुस्तके बंदीवानांना उपलब्ध करून दिली. कारागृहात सध्या २,२०० च्या आसपास बंदी आहेत. काहींचा अपवाद वगळता बहुतांश शिक्षित आहेत. काही उच्चशिक्षितही आहेत. शिक्षण अर्ध्यावर सुटलेले काही बंदी कारागृहातून शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

कल्याणच्या वाचनालयाचा उपक्रम
कारागृहात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व प्रौढ साक्षरता अभियान अंतर्गत शिक्षकांची नेमणूक केली आहे. १७ जणांनी एफवायबीएची, तर आठ जणांनी एसवायबीएची परीक्षा उत्तीर्ण केली.

अग्निपंख, येरवडा विद्यापीठातील दिवस, व्यक्ती आणि वल्ली, श्यामची आई, द थ्री मिस्टेक ऑफ माय लाईफ, मृत्युंजय, लोक माझे सांगाती, रिव्होल्युशन २०२०, उजव्या सोंडेच्या बाहुल्या आदी पुस्तकांना कैद्यांकडून अधिक मागणी आहे.

बंदिवान बनला पोलिस उपनिरीक्षक
एका कैद्याने कारागृहातून स्पर्धा परीक्षेची तयारी करून पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. आठवड्यातून दोन दिवस शिक्षणाचे वर्ग घेतले जातात. लघु अभ्यासक्रम शिकवले जातात. त्याचा लाभ घेत ५४ अशिक्षित बंदींची आता साक्षरतेकडे वाटचाल सुरू आहे. 

व्यक्तीचे अंतर्बाह्य रूप बदलण्याचे सामर्थ्य पुस्तकांमध्ये आहे. त्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून कारागृहातील कैद्यांना समाजाकडून नाकारल्यानंतर एक माणूस म्हणून घडविण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. - भिकू बारस्कर,  सरचिटणीस, सार्वजनिक वाचनालय, कल्याण.

Web Title: Aadhaar of Pawar's Autobiography to Aadhaarwadi Prisoners; Also like to read the biography of Sachin Tendulkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.