मध्य प्रदेशातून सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण; धागेदोर कल्याणमध्ये सापडले
By मुरलीधर भवार | Published: May 10, 2024 05:38 PM2024-05-10T17:38:03+5:302024-05-10T17:38:55+5:30
सहा जणांना कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी केली अटक, मूल नसलेल्या शिक्षकाला बाळ देण्याच्या बदल्यात घेतले २९ लाख रुपये
मुरलीधर भवार, कल्याण: मध्य प्रदेशातून एका सहा महिन्याच्या बाळाचे अपहरण झाले. या अपहरण प्रकरणी कल्याणच्या पोलिसानी सहा जणांना अटक केली आहे. या सहाही आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांच्या हवाली केले आहे. बाळाची सुटका करीत बाळालाही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. एका शिक्षकाला बाळ हवे होते. त्याच्याकडून २९ लाख रुपये घेऊन बाळाचे अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मध्य प्रदेशातील रिवा सिव्हील पोलिस लाईन ठाण्याच्या हद्दीत ७ मे रोजी रात्री रस्त्याच्या कडेला फेरीचा धंदा करणारे जोडपे झोपले होते. जोडप्याच्या कुशीत सहा महिन्याचे बाळ विसावले होते. रस्त्यावरुन जाणाऱ््या दोन दुचाकीस्वारांनी बळजबरीने त्या बाळाला उचलून त्याठिकाणाहून पळ काढला. बाळाचे अपहरण होताच त्याच्या आई वडिलांनी तात्काळ सिव्हील लाईन पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती देत तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने अपहरण करणाऱ््यांना ताब्यात घेतले. तोपर्यंत अपहरण करण्यात आलेले बाळ महाराष्ट्रात आणले गेले होते.
अपहरणकर्त्यांनी नितीन आणि स्वाती सोनी उर्फ मेहक खान या पत्नी पत्नीचे नाव सांगितले. ही माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलिसांनी कल्याण पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि वरिष्ठ पोलिस निरिक्षक अमरनाथ वाघमोड यांनी बाळाच्या शोधाकरीता सहा पथके तयार केली. नितीन आणि स्वाती सोनी या पती पत्नीला ताब्यात घेतले. त्यांनी बाळ त्यांच्या शेजारी राहणारा रिक्षा चालक प्रदीप कोळंबेला दिले आहे असे सांगितले.
पोलिसांनी प्रदीप याला शहाड येथून अटक केली. प्रदीप याने बाळाला अमोल येरुणकर आणि आर्वी येरुणकर या पती पत्नीला दिले आहे असे सांगितले. पोलिस येरूणकर पती पत्नीकडे पोहचले. त्यांनी बाळाला रायगड येथील पोलादपूर येथे राहणारे शिक्षक श्रीकृष्ण पाटील यांना दिले आहे असे सांगितले. पोलिसांनी पनवेल येथून शिक्षक पाटील यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सहा जणांना अटक केल्यावर बाळाच्या अपहरणाची खरी कथा समोर आली. शिक्षक पाटील यांचे वय ५३ वर्षे आहे. त्यांना मुल नसल्याने त्याने त्यांचा विद्यार्थी अमोल येरूणकर याला सहा महिन्याचे बाळ हवे आहे अशी गळ घातली. कोणत्याही परिस्थितीत ते आणून दे असे. अमोल हा एकेकाळी पाटील यांचा विद्यार्थी होता. अमोलने बाळ आणून देण्याच्या बदल्यात पाटील यांच्याकडून २९ लाख रुपये घेतले. पैसे घेऊनही बाळ काही मिळत नव्हते.
अमोल हा एका नामांकित रुग्णालयात अटेंडंट आहे. त्याची पत्नी आर्वी हे शेअर बाजारात कामाला आहे. आर्वी ज्या रिक्षाने प्रवास करायची तो रिक्षाचालक प्रदीप कोळंबे याला सांगितली. तिला एका बाळाची गरज आहे. त्या बदल्यात भरपूर पैसे मिळतील असे आमिष कोळंबे याला दाखविले. ही बाब रिक्षा चालक कोळंबे याने त्याच्या शेजारी असलेले नितीन आणि स्वाती सोनी पती पत्नीला सांगितली. सोनी हे मध्य प्रदेशचे असल्याने त्यांनी त्याठिकाणी जाऊन रेकी केली. फेरीवाल्याचे सहा महिन्याचे बाळ चोरी करण्याची योजना आखली.
अपहरणाचा कट तयार केला. पोलिसांच्या तपासामुळे हा कट फसला. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या सहाही आरोपींना मध्य प्रदेश पोलिसांच्या हवाली केले आहे. पुढील तपास मध्य प्रदेश पोलिस करीत आहे. सुटका करण्यात आलेले बाळ मध्यप्रदेश पोलिसांच्या हवाली केले आहे. शिक्षकाकडून घेतलेल्या २९ लाखातून अमोल येरूणकर याने एक घर ही घेतले आहे. ही बाबही तपास समाेर आली आहे.