अभय योजनेतून आतापर्यंत 27 कोटी रुपयांची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 01:06 AM2020-11-26T01:06:50+5:302020-11-26T01:08:50+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका : १०० काेटींच्या वसुलीचे लक्ष्य
कल्याण : मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने १५ ऑक्टोबरपासून अभय योजना लागू केली आहे. आतापर्यंत या योजनेतून मनपाच्या तिजोरीत २७ कोटी रुपये जमा झाले आहेत. मालमत्ताकर वसुली विभागाच्या हाती आता ३६ दिवस असून, वसुलीचा वेग वाढवल्यास १०० कोटींचे लक्ष्य गाठता येईल, असे सूत्रांनी सांगितले.
अभय योजनेंतर्गत मालमत्ताकर थकबाकीदारांनी एकूण थकबाकीच्या २५ टक्के रक्कम भरल्यास त्यावरील ७५ टक्के व्याज व दंडाची रक्कम माफ केली जाणार आहे. मालमत्ताकराच्या थकबाकीपोटी एक हजार ३८१ कोटी रुपये येणे बाकी आहेत. ही रक्कम मिळाल्यास मनपाची आर्थिक स्थिती सुधारू शकते. यापूर्वीही मनपाने मालमत्ताकराच्या वसुलीसाठी सरसकट अभय योजना लागू केली होती. त्यावेळी एक हजार कोटी रुपये वसूल होतील, असा दावा तत्कालीन आयुक्त गोविंद बोडके यांनी केला होता. मात्र, तेव्हा केवळ ६७ कोटींची वसुली झाली. आता विद्यमान आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही १५ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत अभय योजना लागू केली असून, १०० कोटींची वसुली अपेक्षित आहे. मात्र, १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत २७ कोटींची वसुली झाली आहे.
दरम्यान, अभय योजनेव्यतिरिक्त मनपाने यंदा मालमत्ताकराच्या वसुलीचे लक्ष्य ३५० कोटी रुपये ठेवले आहे. अभय योजनेतील २७ कोटींची रक्कम धरून मनपाने आतापर्यंत १६४ कोटींची मालमत्ताकर वसुली केली आहे. मात्र, वर्षभराच्या वसुलीचे ३५० कोटी व अभय योजनेतून १०० कोटी, असे एकूण ४५० कोटींचे लक्ष्य केडीएमसीला गाठायचे आहे.
१,२०० कोटींची येणी थकीत
अनेक बिल्डरांची खुल्या जागेवरील कामे सुरू नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून मालमत्ताकराची वसुली रखडली आहे. दुसरीकडे एनआरसी कंपनीकडून ११४ कोटींची थकबाकी येणे बाकी आहे. मात्र, कंपनी २००९ पासून बंद असल्याने ही रक्कम वसूल होत नाही. थकबाकीची अनेक प्रकरणे ही वादग्रस्त व न्यायप्रविष्ट असल्याने महापालिकेची जवळपास १,२०० कोटी रुपयांची येणी थकली आहेत.