कल्याण परिमंडलात १७८ कोटींच्या वीजबिल थकबाकी वसुलीचे आव्हान
By अनिकेत घमंडी | Published: March 21, 2024 06:00 PM2024-03-21T18:00:51+5:302024-03-21T18:01:34+5:30
चालू बिलासह थकबाकी भरण्याचे महावितरणचे आवाहन.
अनिकेत घमंडी, डोंबिवली:महावितरणच्याकल्याण परिमंडलात आर्थिक वर्ष संपण्यास अवघे तीन-चार कार्यालयीन दिवस उरले असतानाही वीज ग्राहकांकडे कृषिपंप व कायमस्वरुपी वीज खंडित ग्राहक वगळून तब्बल १७८ कोटी रुपयांच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान कर्मचाऱ्यांसमोर आहे. त्यामुळे थकित रकमेची वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय त्यांच्यासमोर आहेत. संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी थकबाकीदारांनी थकीत रकमेचा तर इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा त्वरित भरणा करावा, असे आवाहन महावितरणने गुरुवारी केले आहे.
थकबाकी वसुलीसाठी मुख्य अभियंत्यांसह जनमित्रांपर्यंत सर्वच स्तरावरील अधिकारी, अभियंते व कर्मचारी वाढत्या तापमानातही वसुलीच्या कामासाठी फिल्डवर आहेत. वीजबिल भरण्याची मूदत संपलेल्या कल्याण परिमंडलातील २ लाख ७६ हजार ९७९ ग्राहकांकडून १७६ कोटी ९७ लाख रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. कल्याण पूर्व आणि पाश्चिम तसेच डोंबिवली विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल कार्यालय एक अंतर्गत ४५ हजार १८१ ग्राहकांकडे १५ कोटी ३२ लाख रुपयांची थकबाकी आहे. उल्हासनगर एक आणि दोन, कल्याण ग्रामीण व बदलापूर विभागाचा समावेश असलेल्या कल्याण मंडल दोन अंतर्गत ८६ हजार ५६१ ग्राहकांकडे ६४ कोटी ८ लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे. वसई व विरार विभागाचा समावेश असलेल्या वसई मंडलातील ९२ हजार ४२७ ग्राहकांकडे ४४ कोटी ९५ लाख तर पालघर मंडलातील ५२ हजार ८१० ग्राहकांकडे ४२ कोटी ४ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. कल्याण परिमंडलात थकीत वीजबिलापोटी १० हजार ३९४ ग्राहकांचा वीजपुरवठा मार्चमध्ये खंडित केला आहे.
मार्च अखेरपर्यंत रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय महावितरणचे संकेतस्थळ, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, विविध पेमेंट वॅलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग मार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. या सुविधांचा उपयोग करून संबंधित ग्राहकांनी थकबाकी व इतर ग्राहकांनी चालू वीजबिलाचा विहित मुदतीत भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.