३०० घरे पाण्यात बुडण्याची भीती, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरसाठी केलेल्या खोदकामामुळे नाला अरुंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 11:19 AM2024-04-26T11:19:31+5:302024-04-26T11:22:01+5:30
जेसीबीने फुटलेल्या जलवाहिन्या पुन्हा नीट न केल्याने नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे.
मुरलीधर भवार, डोंबिवली : दिल्ली ते जेएनपीटी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाच्या कामाकरिता दिवा-वसई रेल्वे मार्गाला लागून असलेल्या डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात सुरू असलेल्या खोदकामाने या भागातील ३०० नागरिकांना पावसाळ्यात पुराच्या पाण्याचा फटका बसणार आहे. जेसीबीने फुटलेल्या जलवाहिन्या पुन्हा नीट न केल्याने नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या नागरिकांची व्यथा प्रकल्पाचे आणि महापालिकेचे अधिकारी ऐकत नाही. या नागरिकांचा प्रश्न सुटला नाही तर ते मतदानावर बहिष्कार टाकण्याचे अस्त्र उपसण्याच्या पावित्र्यात आहेत.
डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पाची उभारणी २०१० पासून सुरू आहे. या प्रकल्पात बाधितांना रेल्वेने बीएसयूपी प्रकल्पात घरे देण्याचा विषय मांडला होता. त्यासाठी महापालिकेस ९४ कोटी रुपये भरले होते. प्रकल्पग्रस्तांनी या बीएसयूपी प्रकल्पातील घरे नको, असे सांगितल्यावर रेल्वेने ९४ कोटी पुन्हा महापालिकेने परत करावे, असे म्हटले होते. प्रकल्पग्रस्तांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. दिवा वसई रेल्वे मार्गाला समांतर असा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्प सुरू आहे.
१) मागच्या वर्षी प्रकल्प अधिकारी आणि महापालिकेची संयुक्त बैठक झाली होती. याला वर्ष उलटून गेले तरी अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. प्रकल्पाकरिता जेसीबीने खोदकाम केल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या फुटल्या.
२) त्या पुन्हा जोडल्या नाहीत. त्यामुळे नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. या तक्रारीकडेही महापालिका आणि प्रकल्प अधिकाऱ्यांचे लक्ष नाही.
अधिकारी देताहेत आचारसंहितेचे कारण-
१) याबाबत शिंदेसेनेचे माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी महापालिका आणि प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला. त्यांची भेटही घेतली. महापालिकेचे अधिकारी सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याचे कारण सांगून हे काम करीत नाही.
२) ४ जून रोजी लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होईल. तोपर्यंत ही समस्या सुटली नाही व जून महिन्यात पावसाळा सुरू झाल्यास लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरेल, याकडे राणे यांनी लक्ष वेधले.