शिकाऊ वाहनचालकामुळे अपघात, दोन वाहनांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2021 12:29 PM2021-07-09T12:29:05+5:302021-07-09T12:29:52+5:30
नवशीख्या वाहन चालकांमुळे घटनांत वाढ, कारवाईची रहिवाश्यांकडून मागणी
डोंबिवली - येथील एमआयडीसी मिलापनगरमध्ये पीकअप मालवाहू शिकाऊ वाहन चालकांकडून अपघात झाला असून सुदैवाने त्यात कोणीही जखमी झाले नाही. शुक्रवारी सकाळी दहा वाजता एका बंगल्यासमोर हेमंत कोशे यांची स्वतःची कार त्यांच्या घरासमोर उभी होती. त्याचवेळी एका मालवाहू पीकअप वाहनाने एका रिक्षाला, कारला जोरदार धडक दिली असून त्यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. त्या वाहनात कोणीही नसल्याने सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.
मिलापनगरमध्ये शिकाऊ वाहनांचे अपघात गेल्या काही दिवसात अनेकदा झाले आहेत. येथील रहिवाशांनी याबाबत गस्तीवरील पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्याचे सांगण्यात आले. काही दिवसापूर्वी एका शिकाऊ कार चालकाने दुचाकीवरील दोन महिलांना ठोकर देऊन जखमी केले होते. मिलापनगर मधील अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कमी आणि मोकळा रोड मिळत असल्याने डोंबिवलीतील अनेकजण वाहन शिकण्यासाठी येथे येत असतात. काही जणांकडे शिकाऊ वाहन चालक परवाना नसतो. बेकायदेशीर शिकाऊ वाहन चालकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी येथील रहिवाशांची मागणी केली आहे.